दिंद्रूड येथील तरुण बालाजी (बाळसाहेब) मंचक लांडे याची पुण्यात हत्या झाली होती. तपासात ही हत्या बालाजीचे अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलीच्या आईने तरुणाला पुणे येथे बोलावून घेतले आणि मित्रांच्या मदतीने त्याची हत्या केली.
या प्रकरणात मुलीची आई रेखा भातनासे, रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे, आदित्य शरद शिंदे यांना अटक केली.तसेच इतर तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मृत बालाजी सावत्र आईसोबत राहत होता. १५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. त्याही अगोदर त्याची सख्खी आई त्याला सोडून माहेरी गेली होती. सावत्र आई सरस्वती यांनीच त्याला सांभाळले. सरस्वती लांडे म्हणाल्या, ३ वर्षांपासून रेखा भातनासे बालाजीला माझ्या मुलीसोबत लग्न लावून देते असे सांगत होती. त्याला कंपनीत काम करायला लावून पगार ती घेत होती. ६ महिन्यांपासून तो दिंद्रूडला आल्याने तिला पैसे मिळत नव्हते, म्हणून तिने बालाजीला पुण्याला बोलावून घेत खून केला. माझी म्हातारपणाची काठी कायमची हरवली, असे त्या म्हणाल्या.