पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी वाल्मीक कराड याला कोर्टाने आणखी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवाली. दरम्यान, कोठडीमध्ये वाल्मीक कराड याची तब्येत बिघडली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आयसीयुमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याच्या सुरक्षेसाठी बाजूच्या रुग्णांना हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी संताप व्यक्त केला आहे.
आमदार सुरेश धस म्हणाले, वाल्मीक कराड याच्या सुरक्षेसाठी बाजूच्या रुग्णांना हलवले असेल तर ते चुकीचे आहे. मी सीएस यांना विचारेन. पंचवीस रुग्णांना हलवणे चुकीचे आहे, चोवीस गोरगरीब रुग्णांचे वाटुळ करणार का?, असा सवालही आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची अजूनही चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. पोलिसांनी त्याला फरार घोषित केला आहे. दरम्यान, या सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. तर खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड यालाही मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान, आता आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणावरुन आरोप केले आहे. धस म्हणाले, महादेव मुंडे यांचा १५ महिन्यापूर्वी खून झाला आहे. त्याचा तपास लागत नाही. हा तपास एलसीबीकडे देण्यात यावा. भदाणे, केंद्र ही ठराविक पोलिसांची नावे आहेत. त्यांनाही आकाने आणून बसवले आहे, असा आरोपही आमदार धस यांनी केला. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणी पंधरा दिवसात पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. याबाबत अधिक्षक यांच्यासोबत चर्चा केली आहे. बीड जिल्ह्यातील पोलीस पूर्ण बदनाम झालं आहे, असंही आमदार सुरेश धस म्हणाले.