बीड बसस्थानकात रात्रीच्या सुमारास चोरट्यांकडून एका वृद्ध महिलेच्या कानातील सोने हिसकावून घेताना चक्क कान तुटल्याने महिला जखमी झाली आहे. नागाबाई मंजुळे (वय ६०) असं महिलेचे नाव आहे. चोरी, लुटमार आणि पाकीटमारीचे प्रकार वाढल्यामुळे बस स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या चोर्यांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी बसस्थानकात एकाच दिवशी दोन वृद्धांचे सोने लुटल्याचा प्रकार घडला होता. आता नव्याने हा प्रकार उघडकीस असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
या घटनेमुळे चोरटे आणि पोलीस यांच्यात मिलीभगत असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये रंगली आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडली. नागाबाई मंजुळे बसने मेहकरहून लातूरला निघाल्या होत्या. त्या बीड बस स्थानकात नैसर्गिक विधीसाठी उतरल्या होत्या. त्या स्वच्छतागृहाकडे जात असताना चोरट्यांनी त्यांच्या कानातले ओरबाडून पळवले. या घटनेवेळी चोरट्यांनी नागाबाई मंजुळे यांच्या कानातील सोन्याचे झुंबर जोरदार झटका देऊन पळवले. या जोरदार झटक्यामुळे नागाबाई मंजुळे यांच्या कानाची पाळी फाटली आणि त्यामधून रक्त वाहू लागले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागाबाई मंजुळे यांना मोठा मानसिक धक्का बसला. आजुबाजूचे नागरिक त्यांची विचारपूस करत होते. मात्र, भांबावून गेलेल्या नागाबाई मंजुळे यांना उत्तरही देता येत नव्हते. त्यांचा कान फाटल्यामुळे त्याच्यातून रक्तस्राव सुरु होता. ही घटना पाहून बस स्थानकातील इतर प्रवाशांनाही जबर मानसिक धक्का बसला.