केज : एका खडी क्रेशरवर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यासाठी कामावर असलेला खाजगी अभियंता खदानीत बुडाला. आपल्या चार साथिदारांसह पोहायला गेला असताना मंगळवारी (दि.१३) दुपारी २ च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अग्निशमन दल आणि खाजगी पानबुड्याची मदत घेऊन त्याचा शोध सुरू आहे. सचिन केरबा गोरे वय २५ वर्ष, (रा.अवंती नगर, बार्शी रोड लातूर ) असे या अभियंत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, केज येथील योगिता इको सँड अँड क्रशर येथे एका एजन्सीद्वारे सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचे काम मागील आठवड्यापासून सुरू आहे. या कामावर अभियंता म्हणून सचिन गोरे आणि त्यांचे आठ साथीदार काम करीत होते. दरम्यान आज (मंगळवारी) दुपारी सचिन केरबा गोरे आणि त्याचे साथीदार सचिन चंद्रकांत पवार ( रा. लातूर), राहुल रविंद्र होदाडे, ओमकार सोमनाथ खोकडे ( दोघे रा. नायगाव ता. कळंब जि. धाराशिव) आणि वैभव बालाजी माके ( रा. लातूर) हे चौघे दुपारच्या वेळी खडी क्रेशर जवळ असलेल्या खदाणीत पोहण्यासाठी उतरले. यावेळी सचिन गौरे हा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागला. ही बाब त्याच्या साथिदारांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड केली. त्याला विचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो काही अंतरावरून दिसेनासा झाला. अग्निशमन दलासह माजलगाव येथील खाजगी पाणबुड्यांमार्फत त्याचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन गोरे याची अग्नीवीर म्हणून देखील निवड असल्याची माहिती समोर आली आहे.