जालना : अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर वाळू माफियांकडून अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. जालन्यातील शहागड येथील गोदावरी नदीपात्रातील घटना घडली. तहसीलदार चव्हाण यांच्याकडून हवेत गोळीबार करण्यात आला. स्वसंरक्षणासाठी त्यांनी बंदुकीतून ४ राऊंड फायर केले. आरोपी वाळू माफिया पसार झाले आहेत. गोंदी पोलीस ठाण्यात ४ अज्ञात वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल.
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात मागील काही दिवसापासून गोदावरी नदी पात्रात वाळू माफिया कडून बेसुमार वाळूचा उत्खनन सुरू आहे. आणि हीच कारवाई करण्यासाठी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण हे शहागड येथील गोदावरी नदीपात्रात सकाळच्या सुमारास गेले असता काही वाळूमाफियांनी त्यांच्या अंगावरती ट्रॅक्टर घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मात्र यावेळी तहसीलदार चव्हाण यांनी स्वसंरक्षणासाठी स्वतःच्या बंदुकीतून चार राऊंड फायर केले तेव्हा हे वाळूमाफिया घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी चार वाळू माफियांच्या विरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन ट्रॅक्टर देखील जप्त केले. दरम्यान मागील काही दिवसापूर्वी परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांच्यावर देखील कारवाई करण्यासाठी गेल्या असता वाळू माफीयांनी लाठ्या-काठ्यांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा वाळू माफीयांचा उच्छाद अंबड तालुक्यात पहायला मिळाला.