बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून अटक असलेल्या वाल्मीक कराडच्या मुलाचा प्रताप समोर आला आहे. वाल्मीक कराड याच्यानंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड हा देखील अडचणीत आला आहे. वाल्मीक कराडच्या मुलाच्या विरोधात सोलापूर न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना सुशील कराड विरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना न्यायालयाने द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सुशील कराड याने एका मॅनेजरच्या घरात घुसून लूट केल्याची तक्रार असल्याचे अर्जात म्हटलं आहे. दोन ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोनं लुटल्याची तक्रार सुशील विरोधात आहे. त्यामुळे आता मुलगा सुशील कराडवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड याच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. सुशील कुमारकडे मॅनेजर म्हणून काम करणार्या व्यक्तीची लूट केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. मूळचे सोलापूरचे असलेली ही व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करत असताना सुशील कराडने त्यांची संपती लुटली. तुम्ही आमची संपत्ती लुटली असा आरोप करत सुशील कराडने मारहाण करत आणि रिव्हॉलवरचा धाक दाखवत आपली संप ताब्यात घेतली, असा आरोप मॅनेजरने केला. बीड आणि सोलापूर पोलिसांवरही या मॅनेजरने आरोप केले आहेत. पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नसल्याने आम्ही सोलापूर न्यायालयात अर्ज दाखल करत असल्याची माहिती तक्रारीद्वारे दिली आहे.
२०२४ च्या ऑगस्ट महिन्यात हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून या प्रकरणी सोलापूर न्यायालयात सुनावणी सुरु होती. अद्याप न्यायालयाने यासंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही. याप्रकरणी सुशील कराड आणि अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार विरोधात गुन्ह्याची नोंद करुन चौकशी करण्याची मागणी मॅनेजरने सोलापूर न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे.
वकिलांनी काय सांगितले?
पीडित महिलेचा पती सुशील कराड याच्याकडे कामाला होता. त्यावेळी सुशील कराड त्याला वारंवार तू एवढे पैसे कसे कमावले, दोन ट्रक, दोन गाड्या कशा आल्या हे विचारायचा. असं म्हणत सुशील कराड त्या व्यक्तीला कायम मारहाण करत होता. सोलापूरमधील पोलिसांनी त्यांच्या तक्रार अर्जाची कोणतीही दखल घेतली नाही. शेवटी पीडित महिलेने सोलापूर जिल्हा न्यायालयात तक्रार अर्ज दाखल केला, अशी माहिती पीडितेचे वकील विनोद सूर्यवंशी यांनी दिली.