मनोज जरांगेंनाही लगावला टोला
मुंबई : राज्यात बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा प्रचंड गाजत असून जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर आणखी दबाव वाढला जात आहे. बीड जिल्ह्यातील आमदार, खासदार हे बीडचे नेते व कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहेत. विशेष म्हणजे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. मात्र, राष्ट्रवादीत मंत्रीपदाची संधी न मिळालेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नसल्याचंही भुजबळांनी म्हटलं. तसेच, यावेळी, नाव न घेता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर केलेल्या टीकेवरुनही पलटवार केला आहे.
छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचे सांगत, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, नायगाव येथे त्यांची भेट झाली. त्यावेळी, नायगाव येथील डेव्हलपमेंटबाबत माझी चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली. मंत्रिपदाबाबत बोलताना देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून कुणाचा बळी द्यावा असं माझ्या मनात येण शक्य नाही. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चौकशी करणार आणि दोषींवर कारवाई करणार. त्यामुळे, त्याआधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागत आहोत?, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. तर, जोपर्यंत कन्फर्म होतं नाही, तोपर्यंत राजीनामा घेणं योग्य नाही. तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाला आणि माझा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे, माझे उपमुख्यमंत्री पद गेल, परंतु सीबीआय चौकशीत माझं नावसुद्धा आलं नाही, असे उदाहरणही भुजबळ यांनी दिले.
भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली. जरांगे यांनी धनंजय मुंडेंना थेट धमकी देत मंत्री धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर बोलताना, इथं लोकशाही आहे, ठोकशाही नाही. जरांगे यांचं उपोषण सोडवायला चारपाच वेळा मुंडे गेले होते, ते एकमेकांना ओळखतात, असे उत्तर छगन भुजबळ यांनी दिले.