नंदूरबार : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. ठिकठिकाणी आंदोलने होऊ लागली आहेत. बीड, परभणीमधील घटनांनी महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. अशातच नंदुरबारमध्येही 23 वर्षीय तरुणीची हत्या झाल्याने आदिवासी समाज आक्रमक झाला आहे.
नंदुरबार तालुक्यातील मलोनी भागात किरकोळ कारणावरुन एका 32 वर्षीय तरुणीवर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान दिपाली चित्ते या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आदिवासी समाज आक्रमक झाला असून शहादा शहरात बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहादा तालुक्यात तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ आज (दि. 6) बंद पुकारला गेला आहे. सकाळपासून व्यापार्यांनी सगळी दुकानं बंद ठेवली आहे. दोन संशयित आरोपींना या प्रकरणात अटक करण्यात आली असून शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.