spot_img
21 C
New York
Thursday, June 12, 2025

Buy now

spot_img

तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई

बीड : मी अशिक्षित. दीड एकर खडकाळ जमीन. आमचे आयुष्यच ऊसतोडणीत गेले. आता २८ वर्षांचा झालो. दोन-तीन वर्षांपासून लग्नासाठी बायको पाहतो, पण भेटलीच नाही. मजूर असलो म्हणून काय झाले. मी पण माणूसच. मलाही बायको पाहिजे ना? म्हणूनच बायकोसाठी तीन लाख रुपये दिले. परंतु आमचा संसार दोन दिवसांचाच राहिला आणि बायको निघून गेली. पोलिसांनी तपास केल्यावर ती पाच वर्षांच्या एका मुलीची आई असल्याचे समजले. आता काय, पैसेही गेले आणि बायकोही. पुन्हा मी एकटाच… अशी व्यथा दोन दिवसांपूर्वी फसवणूक झालेल्या तरुणाने मांडली.
राहुल (नाव बदलले रा. वडवणी) याची घरची परिस्थिती गरीब. आई-वडील, मोठा भाऊ आणि राहुल हे सर्वच ऊसतोडणी करतात. मागील वर्षी कर्नाटकात गेल्यावर त्याची ओळख यमुनाबाई शिंदे (रा. सेलू, जि. परभणी) हिच्यासोबत झाली. राहुलने तिच्याजवळ बायको पाहिजे म्हणून आशा व्यक्त केली. त्याप्रमाणे ३१ मे रोजी यमुनाबाई हिने राहुलला कॉल करून सेलूला मुलगी पाहायला बोलावले. त्याच दिवशी मुलगी पसंद करून ते परत गावी आले. त्यानंतर १ जून रोजी मंदिरात विवाह लावला. दुसरा दिवस देवदर्शन झाल्यानंतर ३ जून रोजी सत्यनारायणाची पूजा झाली. पाहुणे जेवण करत होते. तेवढ्यात नवरीने मैत्रिणीला कॉल करून त्रास होत असल्याचे सांगितले. काही क्षणातच पोलिस घरी आले. त्यानंतर सर्व चौकशी केली असता, नवरी आणि तिचे नातेवाईक बनावट असल्याचे समजले. त्यावरून वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
कोणाचा काय रोल?
नवरी – वैभवी राम शेटे (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर), मध्यस्थी – यमुनाबाई शिंदे (रा. सेलू, जि. परभणी), नवरीचे काका – मावशी – उमेश राठोड, चंदा उमेश राठोड (रा. अकोला), वाहन चालक – रणजीत उत्तम आहेर, नवरीची मैत्रीण – मनीषा नरेंद्र नन्नवरे (दोघेही रा. संगमनेर)
राठोड दाम्पत्यास अडीच, तर मध्यस्थीला ५० हजार
३१ मे रोजी मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर १ जून रोजी राठोड दाम्पत्य आणि यमुनाबाई शिंदे हे राहुलच्या घरी आले. दुपारच्या सुमारास यमुनाबाईकडे ५० हजार, तर राठोड दाम्पत्याने अडीच लाख रुपये घेतले. त्यांच्यासोबत वैभवीदेखील होती. तिला सोडून बाकीचे परत गेले. हे सर्व पैसे मुकादमाकडून उचल म्हणून घेतले होते. आगामी हंगामात ऊसतोडणी करून ते परत करणार होतो, असे राहुल म्हणाला.
लग्नाळू तरुणांना शोधायचे. त्यांच्या नातेवाइकांना संपर्क साधून भावनिक करायचे. नंतर लग्न करून एक-दोन दिवस सासरी थांबायचे. नंतर घरचे लोक किंवा इतर नातेवाईक आजारी असल्याचे सांगून पैसे उकळायचे. जर हे यशस्वी झाले नाही तर सासरचे लोक त्रास देत आहेत, असे म्हणून पोलिस ठाणे गाठायचे. या प्रकरणातही वैभवीने मैत्रीण मनीषाला असेच सांगून बोलावून घेतले होते. परंतु सर्वांची वेगवेगळी चौकशी केल्याने या टोळीचा भांडाफोड झाला. आता चौघेजण पोलिस कोठडीत आहेत, तर राठोड दाम्पत्य फरार आहे.

ताज्या बातम्या