बीड : राज्य परिवहन महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले चिंचाळा येथील दत्ता अंबलकर या वाहकाने २६ जानेवारीच्या मध्यरात्री शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका वाहकाने तिकीट न काढल्याने केलेल्या कारवाईत वाहक अंबलकर यांना निलंबित करण्यात आले होते, या तणावातूनच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, हा महामंडळाच्या चुकीच्या व्यवस्थेचा बळी आहे, असा आरोप अंबलकर यांच्या नातेवाइकांनी केला आहे.
दत्ता आंबळकर हे गेल्या दहा वर्षापासून परिवहन महामंडळाच्या माजलगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. महिना भरापूर्वी एका प्रवाशाने तिकीट न घेता प्रवास केल्याचे उघडकीस आल्यानंतर वाहक अंबलकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे वाहक अंबलकर हे तणावात होते. यानंतर ते १२ जानेवारीपासून कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. अंबलकर यांच्या वडिलांनी माजलगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद केली होती.
दरम्यान, २६ जानेवारीच्या मध्यरात्री अंबलकर यांनी आपल्या शेतात येत शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी यांचे वडील शेतात गेल्यावर ही बाब उघडकीस आली. वडवणी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामाकरून शवविच्छेदनासाठी कुप्पा येथील आरोग्य केंद्रात पाठवले. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने दवाखान्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर माजलगाव बस स्थानकाचे आगार प्रमुख कोळपकर यांच्यासह अनेक कर्मचार्यांनी कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन नातेवाईकांची समजूत काढली. कुटुंबातील एका व्यक्तीला महामंडळात नोकरीला घेता येईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. चिंचाळा येथे दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले