spot_img
1.2 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

बीडच्या लिपीकाने पुण्यात केली बायकोची हत्या

पुणे : कौटुंबिक वादातून एकाने पत्नीवर कात्रीने वार करुन खून केल्याची घटना बुधवारी पहाटे खराडी भागात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसंनी पतीला अटक केली. ज्योती शिवदास गिते (वय २८, रा. गल्ली क्रमांक ५, तुळजाभवानी नगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. बुधवारी (२२ जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवदास गिते मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालायात टंकलेखक आहे. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. बुधवारी पहाटे ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर कात्रीने वार केले. शिवदासने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. आरडाओरडा ऐकून गाढ झोपेत असलेले शेजारी जागे झाले. शेजार्‍यांनी चौकशी केली. तेव्हा ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवदासला अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

याबाबत पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव म्हणाले, आरोपी शिवदास 2021 मध्ये कोर्टात नोकरीला लागला होता. नियमानुसार तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला स्टेनोसाठी परीक्षा द्यायची होती. जर तो परीक्षा उत्तीर्ण झाला नसता तर त्याला नोकरी करता येणार नव्हती. त्याने स्टेनोची परीक्षा दिली होती. मात्र, तो नापास झाला होता. त्यामुळे शिवदास याने हायकोर्टात अपील केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हायकोर्टाने परत सहा महिन्यांनंतर परीक्षा घ्या, तोपर्यंत त्याला नोकरीवरून काढू नका, असा आदेश दिला होता. पत्नीला वाटत होते की, पतीने जर परीक्षा उत्तीर्ण नाही केली, तर नोकरी जाईल. त्यामुळे पत्नी त्याला अभ्यास करण्यास सांगत होती. कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी पत्नी घरकाम देखील करत होती. दुसरीकडे पतीने गावी काही कर्ज काढून ठेवले होते. त्यातून दोघांत वाद होत होते. बुधवारी पहाटे शिवदास पाणी पिण्यासाठी उठला होता. त्या वेळी पत्नी ज्योती देखील उठली. दोघांमध्ये परत वाद झाला. त्या वेळी त्याने कात्रीने वार करून पत्नीचा खून केला. हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा त्यांचा सहा वर्षांचा मुलगा घरात होता.

ताज्या बातम्या