spot_img
2 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

विष्णू चाटेला खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी

खंडणीचा तपास पूर्ण, खुनाचा गुन्हा असल्याने एसआयटीला मिळू शकतो ताबा
बीड : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर रोजी झाली होती. या सगळ्या मुळाशी खंडणी प्रकरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. पवनचक्की प्रकल्प अधिकार्‍यांना खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणात वाल्मीक कराडला अटक झाली आहे, त्यात आता या प्रकरणात विष्णू चाटेला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर केज कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामुळे आता चौकशीला आणखी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विष्णू चाटेवर खुनाचाही गुन्हा दाखल झाला आहे. खुनाचा तपास एसआयटीकडून केला जात आहे, तर सीआयडीकडून खंडणीचा तपास सुरू आहे. यात खंडणी प्रकरणी तपास संपला असे सीआयडीने कोर्टात म्हंटले. विष्णू चाटेला केज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी केवळ सात मिनिटांत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला व कोर्टाने विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, विष्णू चाटेवर खुनाचा गुन्हा असल्याने एसआयटीला त्याचा ताबा मिळू शकतो.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील वाल्मीक कराडचे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. वाल्मीक कराड मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी देखील त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडमधील गुन्हेगारी तसेच वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.
वाल्मीक कराड आणि आता विष्णू चाटेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. यावर अंजली दमानिया यांनी थेट सीआयडीलाच सवाल केला आहे. सीआयडी आणि एसआयटीची चौकशी जी होती ती संतोष देशमुख हत्येच्या चौकशीसाठी होती. खंडणीचे आरोप शोधण्यासाठी नव्हती. असे असताना सीआयडीने वाल्मीक कराडला कोणत्या ग्राउंडवर अटक केली, खंडणीमध्ये सीआयडी होते का? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या, मे महिन्यात देखील खंडणीचे प्रकरण गंभीर झाले होते. त्यावेळेस जर योग्य कारवाई झाली असती तर संतोष देशमुख यांचा जीव गेला नसता. खंडणीची मागणी मे महिन्यापासून होती. एका अधिकार्‍याचे अपहरण देखील केले गेले होते आणि या सगळ्या गोष्टी एकच आहेत. विष्णू चाटे आणि जे काही माणसे होती त्यांनी फक्त आणि फक्त वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून काम केले होते, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.

ताज्या बातम्या