spot_img
1.9 C
New York
Sunday, March 23, 2025

Buy now

spot_img

एकनाथ शिंदेंनी विश्‍वासघात केला

शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी
भंडारा – मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्यानं नाराज होत भंडारा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात मागून आलेल्यांना न्याय मिळतो, परंतु आम्हाला नाही. भाजपा प्रवेशाचा आग्रह असताना आम्ही शिवसेनेत आलो त्याचा आता पश्चाताप झाल्यासारखं वाटतं असं विधान भोंडेकर यांनी केले आहे.
मंत्रिपद न मिळाल्याने नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेता पदाचा राजीनामा दिला आहे. ते म्हणाले की, मागच्या अडीच वर्षापूर्वी १० अपक्ष आमदारांमध्ये सगळ्यात आधी मी एकनाथ शिंदेंसोबत गेलो. कुठलाही स्वार्थ न ठेवता मी गेलो तेव्हा मला शब्द दिला होता. नक्कीच सरकार आपलं होणार आहे, तुम्हाला सन्मानाने मंत्रिपद देऊ परंतु मंत्रिपद दिले नाही. मात्र मंत्रिपद न मिळताही सोबत राहिलो, आमचा उद्देश सेना-भाजपा सरकार राहिले पाहिजे असा होता. अडीच वर्षानंतर जेव्हा पक्षप्रवेशाची वेळ आली. तेव्हा चर्चा झाली, मागे मंत्रिपद नाही, महामंडळही दिले नाही परंतु आता नव्या सरकारमध्ये तुम्हाला मंत्री बनवू असं सांगितले. आमच्यात बोलणे झाले तेव्हाही शब्द दिला आणि जाहीरसभेतही बोलून दाखवले असं त्यांनी सांगितले.
तसेच एवढे झाल्यानंतर आज जे मागून आलेत, पक्षप्रवेश केलेत त्यांना मंत्रिपदे दिली. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाही. इकडे तिकडे जातात त्यांना मंत्रिपद दिले मग मी पदावर राहून करू काय? शिवसेनेत नेता, उपनेता हे मोठे पद असते. ६ जिल्ह्याचे समन्वयक पद आहे. परंतु कुठलीही चर्चा नाही. कुठलीही विचारपूस नाही. कुठलीही संधी नाही. मी जर न्याय देऊ शकत नाही त्यासाठी पदाचा राजीनामा दिला. भविष्यात अनेक गोष्टी आहेत ज्या माझ्या मनात आहेत त्या मी आज सांगू शकत नाही. मी शिवसैनिक म्हणून आहे आणि राहीन परंतु जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर मी फक्त माझ्या जिल्ह्यातील लोकांसाठी थांबलो आहे नाहीतर आमदारकीचाही राजीनामा दिला असता. आमचा जिल्हा कधीपर्यंत बाहेरच्या उधार पालकमंत्र्यावर राहील, जिल्ह्याचा पालकमंत्री असता तर नक्कीच विकास झाला असता. त्यासाठीच आम्ही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला परंतु आज शोकांतिका आहे आमच्या जिल्ह्याचा पुन्हा पालकमंत्री मिळणार नाही अशी खंत आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी बोलून दाखवली.

ताज्या बातम्या