बीडमध्ये आयोजित बैठकीला मेळाव्याचे स्वरूप
बीड : दि.28 : युवा नेते डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी शहरातील संपर्क कार्यालयात आज 1 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. त्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यांनी आज मुहूर्त चांगला असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. महायुतीचा बीडच्या जागेचा निर्णय झालेला नसून अजूनही अपेक्षा आहेत. परंतु, आपण भरलेला उमेदवारी अर्ज काढण्यासाठी नसेल, अशा शब्दात डॉ.योगेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महायुतीकडून बीडच्या जागेचा तिढा अध्यक्ष सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बैठक बोलावून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला. तातडीने बोलावलेल्या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले होते. योगेशभैय्या आता निर्णय घ्या, माघार घेऊच नका, अशा शब्दात पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, बीडवासियांनी अनेकांना संधी दिल्या. क्षीरसागर कुटुंबातील माझ्या वडीलासंह अनेकांना संधी मिळाली. एकदा मला संधी देऊन बघा. मला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची आहे, जातीपातीच्या राजकारणात मला पडायचे नाही. मी 24 तास जनतेच्या दरबारात आहे. मोठ्या अपेक्षेने कामे घेऊन सर्वसामान्य लोक आपल्याकडे येतात. लोकांची सेवा करतानाच पक्षाचा प्रत्येक आदेश पाळून पक्ष संघटन केले. प्रत्येक बूथ, गल्ली, वॉर्डात पक्ष पोहचविला. प्रत्येक बूथवर फक्त आपली यंत्रणा सक्षम आहे. जनतेच्या आशीर्वादाने निवडणुकीला सामोरे जाऊ, आपली ताकद दाखविण्याची वेळ आली आहे, असे डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले.
शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार
डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या बैठकीस आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तत्काळ अर्ज भरा असा आग्रह धरला. त्यानंतर डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सौ.के.एस.के. महाविद्यालयापासून पायी चालत जाऊन तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला. यावेळी तहसील कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.