बीड : येथील शहर पोलीस ठाण्यात 307 प्रकरणातील आरोपीला भेटण्यासाठी थेट चार पोलिसांनीच मद्यप्राशन करून धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ एकीकडे खाकीचा धाक निर्माण करत असताना त्यांचेच कर्मचारी दारू पिऊन आरोपीला भेटण्यासाठी धूडगुस घालत असल्यामुळे खळबळ उडाली आहे.
विपुल गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर 307, 327/23 भादवि नुसार गुन्हा दाखल आहे. विपुल मागच्या अनेक दिवसांपासून फरार होता. त्याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे तो शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये होता.यावेळी विपुलला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास 10 ते 12 जण दारूच्या नशेत आले होते. यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार रेडेकर यांनी या सर्वांना भेटीपासून रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र दारूच्या नशेत असलेल्या लोकांनी रेडेकर यांना शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला.विशेष म्हणजे कायद्याची पायमल्ली करण्यात चार पोलीस कर्मचार्यांचा वाटा होता. यात मुख्यालयातील विनायक जोगदंड, आरसीपीमधील श्री. खेडकर, गेवराईचे पोलीस कर्मचारी गणेश कुटे आणि शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संदीप कांबळे यांनी धिंगाणा घातल्यामुळे त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.