spot_img
4 C
New York
Saturday, March 14, 2026

Buy now

spot_img

ऊसाच्या फडात आढळला वृद्धाचा जळालेला मृतदेह

अंबाजोगाई  : तालुक्यातील ममदापूर शिवारात शनिवारी (दि.१४) पहाटे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतातील ऊसाला लागलेल्या आगीत ६० वर्षीय वृद्धाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विश्वनाथ पांचाळ (वय ६०) असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आजाराला कंटाळून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
ममदापूर येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागली. आज शनिवारी (दि.१४) पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने ही माहिती दिली. जेव्हा आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा ऊसाच्या सरीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसून आला. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्षित (च.अ.) होते आणि वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते टीबी (क्षयरोग) या आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे ते मानसिक तणावात असल्याची चर्चा गावात आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांनी स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
शेतकरी दिलीप देशमुख यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. शेजारील शेतकरी सुरेश बुरगे यांनी शेत रस्ता अडवल्यामुळे त्यांचा ऊस कारखान्याला जाऊ शकला नाही. “रस्ता मोकळा करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज देऊनही प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही. रस्ता मिळाला असता तर ऊस आधीच तुटला असता आणि ही दुर्दैवी घटना घडली नसती,” असे देशमुख यांनी म्हटले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. “आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःला पेटवून घेतले असावे असा प्राथमिक अंदाज आहे, मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल,” अशी माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

ताज्या बातम्या