बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी जयराम चाटे तब्बल १४ महिन्यांनंतर काही तासांसाठी जेलबाहेर येणार आहे. त्याच्या धाकट्या भावाच्या निधनानंतर होणार्या धार्मिक विधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात जाण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे याचे २ मार्च रोजी तांबवा गावात निधन झाले. हिंदू धर्मपरंपरेनुसार निधनानंतर बाराव्या दिवशी होणारा धार्मिक विधी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या विधीस उपस्थित राहण्यासाठी जयराम चाटेच्या वकिलांनी न्यायालयात विशेष परवानगी मागितली होती.
या अर्जावर ६ मार्च रोजी जिल्हा व विशेष न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला विरोध दर्शवला होता. मात्र सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचे शुल्क स्वतः भरावे लागणार आहे. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे त्याच्यासाठी बंधनकारक असणार आहे.

