अहिल्यानगर : अजय महाराज बारस्कर हे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं चर्चेत आले होते. मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी यापूर्वी टीकेची झोड उठवली होती. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा येथे अजय महाराज बारस्कर यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये दोन मद्यधुंद तरुणांनी धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अजय महाराज बारस्कर यांनी मद्यधुंद तरुण मनोज जरांगे यांचे समर्थक असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी बारस्कर यांच्या घरातून संबंधित तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
अजय महाराज बारस्कर यांच्या घरी रात्रीच्या वेळी दोन तरुण दाखल झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळतं. ते दोघे येतात त्यावेळी अजय बारस्कर यांची आई तिथं बसलेली असते. त्यानंतर तिथं बारस्कर यांच्या घराशेजारी राहणारा व्यक्ती येतो. हे पाहताच दोन तरुणांपैकी एक जण त्या व्यक्तीला मारहाण करतो. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यासंबंधीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिल्याची माहिती अजय महाराज बारस्कर यांनी दिली आहे.