खा.बजरंग सोनवणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
बीड: आष्टी/पाटोदा तालुक्यासह जिल्हाभरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मदती संदर्भात गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, मागील २ ते ३ दिवसांपासून आष्टी, पाटोदा तालुक्यासह जिल्हाभरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा, उडीद,सोयाबीन, पिकांबरोबर इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळून देण्याकरिता सुयोग्य ती कार्यवाही करावी. जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी घरांची पडझड झालेली असेल, शेती खरडून गेलेली असेल अशा ठिकाणी आपल्या तलाठ्यांनी स्वत: भेटी देवून स्थळ पंचनामे करून सामान्य नागरिकांना वेळेत मदत मिळवून देण्यासाठी काम करावे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले असून त्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत करणे आवश्यक आहे. शासन स्तरावर मदत करण्यासाठी पंचनामे आवश्यक असतात. यामुळे तातडीने पंचनामे करून अहवाल तयार करावा, असेही पत्रात म्हटले आहे. खा.बजरंग सोनवणे हे सद्या दिल्ली येथे अधिवेशनात आहेत. तरीही त्यांचे जिल्ह्याकडे लक्ष लागलेले असून शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात त्यांनी पत्रव्यवहार केला आहे.