spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

नाशिकमध्ये दिवसाढवळ्या दरोडा

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता सिडको परिसरात एका सोन्याच्या दुकानात भरदिवसा सशस्त्र दरोडा पडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी सोन्याच्या दुकानातून वीस ते पंचवीस तोळे सोने चोरल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील सिडको परिसरात असलेल्या एका सोन्याच्या दुकानात भरदिवसा दरोडा टाकण्यात आला. दोन बंदूकधारी दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून सोन्याच्या दुकानात प्रवेश केला. यानंतर कर्मचार्यांना बंदुकीचा धाक दाखवत दुकानातून वीस ते पंचवीस तोळे सोने चोरी केली.
यानंतर दोघेही दरोडेखोर दुचाकीवर पसार झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून नाशिक पोलिसांकडून चोरट्यांचा शोह घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. भर दिवसा सोन्याच्या दुकानात दरोडा पडल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, मालेगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात रोजंदारीवर डाटा एन्ट्रीचे काम करणार्‍या एकाने ५ कोटी ७६ लाख ९८ हजार ६३५ रूपयांचा अपहार केल्याने पोस्टाच्या खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मालेगावचे उपविभागीय डाक अधीक्षक संदीप उमाकांत पाटील यांनी असीम रजा शहादत हुसेन या तरुणाविरूध्द शहर पोलिसात तक्रार दिली आहे. संशयित असीम हा पोस्ट कार्यालयात रोजंदारी डाटा एन्ट्रीचे काम करीत असे. त्याने मुख्य डाकघरातील कर्मचार्‍यांचा विश्वास संपादन करून युजर आय.डी. व पासवर्ड चुकीच्या मार्गाने मिळविला. त्याने १ जानेवारी २०२२ ते १ डिसेंबर २०२४ पर्यंत १५९ विमा पॉलीसी धारकांची रक्कम कुणालाही न कळू देता पोस्ट कार्यालयात स्वतःच्या बचत खात्यात बेकायदेशीर पध्दतीने वर्ग केली. हा प्रकार पोस्टाच्या लेखा परिक्षणाच्या वेळी निदर्शनास आला. या प्रकरणामुळे पोस्टातील कर्मचार्‍यांच्या विश्वासार्हतेवरील शंका निर्माण झाली आहे. सलग दोन वर्षापासून हा प्रकार सुरू असतानाही हे लक्षात कां आले नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. दरम्यान, डाक अधिक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार असीम रजा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या