spot_img
1.2 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

आमदार धसांना डावलले; डीपीसीच्या नामनिर्देशित सदस्य आ.पंडित, मुंदडा

बीड : जिल्हा नियोजन समितीची बैठक आज बीडमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होत आहे. या बैठकीच्या पूर्वसंध्येला शासनाने डीपीसीच्या नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली. बीडमधून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती केली गेली आहे. आ. सुरेश धस यांना डावलल्याची चर्चा आहे.
राज्यातील सर्वच जिल्हा नियोजन समित्यांच्या नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी राज्याच्या नियोजन विभागाने घेतला होता. त्यानंतर बुधवारी नव्या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. बीड जिल्ह्यातून आ. विजयसिंह पंडित आणि आ. नमिता मुंदडा या दोघांना नामनिर्देशित सदस्य म्हणून जिल्हा
नियोजन समितीवर नियुक्ती मिळाली आहे. इतर आमदार हे लोकप्रतिनिधी या नात्याने बैठकीस उपस्थित राहू शकतात, मात्र ते थेट डीपीसीचे सदस्य नसतात.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांशी असलेल्या जवळिकीतून आ. पंडित यांची नियुक्ती राष्ट्रवादीकडून झाली आहे. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे हे मंत्री आहेत. त्यामुळे आ. सोळंके यांच्याऐवजी आ. पंडित यांच्या नावाला पवारांनी पसंती दिली. तर निवडून आल्यानंतर पंकजा मुंडेंवर आरोप आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंवर आरोपांच्या फैरी झाडून राज्यभरात चर्चेत आलेल्या सुरेश धस यांना मात्र भाजपकडून डावलले गेले असल्याचे दिसत आहे. भाजपच्या कोट्यातून पंकजा मुंडे यांच्या विश्वासू समजल्या जाणार्‍या केजच्या आ. नमिता मुंदडा यांची नियुक्ती केली आहे. दोन्ही सदस्य शासनाकडून नामनिर्देशित असल्याने त्यांना समितीत गरज पडल्यास मताचा अधिकार असणार आहे.

ताज्या बातम्या