बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आष्टी-पाटोदा-शिरुर मतदारसंघातील भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेत महायुतीतील मंत्र्याविरोधात रान पेटवलं. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानेच बीड जिल्ह्यात गुंडगिरी फोफावली असल्याचा आरोप करत धस यांच्यासह काही आमदारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. तसंच बीडचा बिहार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता बीड जिल्ह्यातील गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी नाव न घेता सुरेश धस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. मात्र बीडचा बिहार केलाय, असं म्हणत जिल्ह्याची बदनामी करणं चुकीचं आहे. आम्ही जेव्हा मुंबई-पुण्यात जातो तेव्हा लोक आमच्याकडे आता वेगळ्या नजरेने बघत आहेत. लोकप्रतिनिधी हा समाजाचा चेहरा असतो आणि याच लोकप्रतिनिधींनीच जिल्ह्याची बदनामी करणं योग्य नाही. याचा परिणाम आपल्या दोन-तीन पिढ्यांना भोगावा लागेल, असं म्हणत आमदार विजयसिंह पंडित यांनी अप्रत्यक्षरीत्या सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी हा राजकीय विषय आहे. त्याबाबत आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार निर्णय घेतील. मात्र हत्या प्रकरणातील फरार असलेला एक आरोपी जर मार्चच्या अधिवेशनापर्यंत पकडण्यात आला नाही तर आम्ही अधिवेशनात सरकारला जाब विचारू, अशीही भूमिका आमदार पंडित यांनी मांडली आहे.
दरम्यान, सुरेश धस यांनी बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादानेच जिल्ह्यात वेगवेगळ्या टोळ्या चालवत असल्याचा आरोप सातत्याने केला आहे. वाल्मीकमुळे धनंजय मुंडे गेल्या ५ वर्षात बिघडले. वाल्मीकने धनंजय मुंडेंचा पूर्ण विश्वास संपादन केला. त्यामुळे वाल्मीक म्हणेल तेच धनंजय मुंडे ऐकायचे. वाल्मीकने धनंजय मुंडेच्या पाठिंब्यानेच हे केले, असं आमदार धस यांनी म्हटलं होतं.