बीड : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या व खंडणी प्रकरणी आज (दि.१) केज न्यायालयात मध्यरात्री सुनावणी पार पडली. यादरम्यान खंडणीप्रकरणी वाल्मिक कराड याला न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यामुळे वाल्मिक याची नवीन वर्षाची सुरूवात पोलिस कोठडीत होणार आहे.
या प्रकरणीवर रात्री उशिरा न्यायालयात सुनावणी सुरू होती. ऍड.जे. बी. शिंदे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. तर कराडच्या बाजूने ऍड. अशोक कवडे यांनी काम पाहिले. यावेळी कराडच्या वकीलांनी वाल्मिक हा गरीब माणूस असून त्याला राजकीय द्वेषातून या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचा युक्तीवाद केला. तसेच त्याने स्वत: हून पोलिसांना शरण जात सीआयडी कार्यालयात हजर झाल्याने त्याला न्यायालयीन कोठडी द्या, अशी मागणी करत बाजू मांडली होती.
या दरम्यान देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणीचा वाद या दोन्ही गुन्ह्यांच कनेक्शन असल्याचे सीआयडीने न्यायालयात स्पष्ट केले. तसेच सुदर्शन घुले हा वाल्मिकच्या सांगण्यावरून काम करत होता. कराडने आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली असल्याचेही सीआयडीने न्यायालयात स्पष्ट केले. याप्रकरणी संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात कराडचा काय संबंध आहे का? हे तपासून पाहण्यासाठी कराडला १५ पोलिस कोठडी द्या, अशी मागणी पोलिसांनी सरकारी वकिलांमार्फेत केली. यादरम्यान सरकारी वकील ऍड.जे. बी. शिंदे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे.