spot_img
2 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये ‘काळा आक्रोश’

बीड  : बीडमध्ये काळा आक्रोश उसळला आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्व धर्मीयांचा मोर्चा निघालाय. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा दाखल झाला आहे. काळ्या फिती लावून, काळे झेंडे हातात घेऊन हजारो लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत. सर्वत्र काळे कपडे घातलेले आणि काळे झेंडे घेतलेले लोक दिसत आहेत. या काळ्या आक्रोशात महिला, ज्येष्ठ नागरीक, तरुण मोठ्या संख्येने हजर झाले आहेत. या मोर्चातून एकच मागणी करण्यात येत आहे, ती म्हणजे वाल्मिकी कराडला अटक करा. धनंजय मुंडे राजीनामा द्या प्रत्येक मोर्चेकर्‍यांच्या तोंडी ही एकच मागणी आहे. सर्वजण या हत्येच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत.
आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात माजी खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनावणे, प्रकाश सोळंके, मनोज जरांगे, ज्योती मेटे, जितेंद्र आव्हाड आदी नेते सहभागी झाले आहेत. या मोर्चात हजारो महिला आणि पुरुष सामील झाले आहेत. या मूक मोर्चात सर्वच पक्षाचे लोक आले आहेत. प्रत्येकाच्या हातात काळे झेंडे आहेत. प्रत्येकाच्या हातात फलक आहे. संतोष देशमुखला न्याय द्या, संतोष देशमुखच्या मारेकर्‍यांना अटक करा, असं या फलकवर लिहिलेलं होतं. तसेच वाल्मिकी कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, अशी मागणी हे मोर्चेकरी करत आहेत.
या मोर्चाचं रुपांतर सभेत झालं आहे. प्रत्येक नेता आक्रमकपणे आपले मुद्दे मांडत आहेत. प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे, वाल्मिकी कराड यांना अटक करा. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड हे सुद्धा मोर्चात सहभागी झाले आहेत. वाल्मिकी कराड हा नरभक्षक आहे. तो महाराष्ट्रातील रमन राघव आहे. या नराधमाला ठेचलं पाहिजे. माझा आंदोलकांना पाठिंबा आहे. कारण ही माणुसकीची लढाई आहे. ही कोण्या पक्षाची लढाई नाही, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावेळी अ‍ॅड. चंद्रकांत नवले यांनीही आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. संतोष देशमुखच्या मारेकर्‍यांना अटक करा. नाही तर आम्ही पुढची अजून मोठी लढाई लढू, असा इशारा नवले यांनी दिला.

नेमकं काय म्हणाली वैभवी देशमुख?
’आत्ताच मला माझ्या चाचाने सांगितलं, माझ्या वडिलांचा जन्म हा इथेच झाला होता. आनंद हॉस्पिटलमध्ये आणि माझ्या पणजीने त्यांचा नाव इथल्या संतोषी माते वरून संतोष असं ठेवलं होतं. म्हणून मी याच ठिकाणावर तुम्हा सर्वांना एक विनंती करते, माझ्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे, तुम्हा सर्वांना माहिती आहे. त्यांची हत्या कशाप्रकारे झाली. त्यांचा याच्यामध्ये काही गुन्हा नसताना ते समाजसेवक असताना, समाजासाठी त्यांनी कार्य केले आणि शेवटपर्यंत ते समाजासाठी झुंजत होते. त्या दिवशी सुद्धा एका दलित समाजाच्या व्यक्तीची मदत करत असताना हा प्रसंग घडला. ही वेळ आज माझ्यावर आणि माझ्या कुटुंबाला ही वेळ आली आहे, दुसर्‍या कोणावर ही वेळ येऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असं वैभवी देशमुख यावेळी बोलताना म्हणाली आहे. तर, ’जसं काल आभाळ आलं होतं, सूर्य झाकला होता. आज ऊन पडलं आहे, आज सूर्य चांगला प्रकारे दिसतो. पण, माती आड गेलेले माझे वडील मला कधी दिसणार नाही आणि त्यांचं हे बलिदान आपण व्यर्थ म्हणून जाता कामा नये. तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत राहा आणि माझ्या कुटुंबासोबत राहा. माझ्या वडिलांना न्याय मिळवून घेऊ, हा लढा आपण सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाऊन लढू. हा अन्याय होतो आहे हा अन्याय पुन्हा होऊ नये म्हणून आपण लढू. आपण मिळून पुढे जाऊ माझ्या वडिलांना आणि आपल्याला सर्वांना न्याय मिळवून घेऊ, तुम्ही असेल सोबत राहा असं आवाहनही तिने यावेळी केलं आहे.

ताज्या बातम्या