बीड : सोशल मिडीयावर रिव्हाल्वर मधून हवेत गोळीबार करणार्या परळी येथील इसमाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सदर व्हीडीओ मधील व्यक्ती ही कैलास बाबासाहेब फड ( रा. कन्हेरवाडी, ता. परळी, ह.मु. बँक कॉलनी, परळी वै. ) असल्याची परळी शहर पोलीसांची खात्री झाल्यानंतर या प्रकरणात दोन दिवसापूर्वीच गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी कैलास फड याला अटक केली आहे. त्याच्या जवळील रिवाल्वर देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
परळी येथील आरोपी कैलास बाबासाहेब फड याने त्याच्याकडील परवाना प्राप्त असलेल्या रिव्हॉल्वरमधून हवेत फायर केलेल्या घटनेबाबत माहिती घेता सदरची घटना ही सुमारे एक वर्षापुर्वीची असून त्याने त्याच्या घरासमोरील वाहनाची पुजा करतांना हवेत फायर केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. परंतू आरोपी कैलास बाबासाहेब फड याने जिल्हाधिकारी यांचे शस्त्र परवान्यातील अटी शर्तीचे उल्लंघन करुन रिव्हॉल्वर मधून हवेत फायर केल्याने त्याच्याविरुद्ध पोलीस शिपाई विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून दोन दिवसापूर्वीच परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील आरोपी कैलास बाबासाहेब फड यास आज दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधिक्षक नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले, पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली वाय. बी. शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पो.स्टे. परळी शहर हे करीत आहेत.