बीड : जिल्ह्यात आगोदरच कायदा व सुव्यवस्था बिघडललेली आहे. यातच पोलिस वादात सापडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता पोलिस अधीक्षक कार्यालयातून तब्बल १० बॅटर्यांची चोरी झाली.विशेष म्हणजे, या बॅटर्या पोलिसानेच चोरल्या आहेत. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून सहायक फौजदार व दुकानदार यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे.
अमित मधुकर सुतार (रा.खोकरमोहा ता.शिरूरकासार)व माधव गोरक्षनाथ जानकर (रा.वडगाव गुंदा ता.बीड) असे आरोपींची नावे आहेत. सुतार हे सहायक फौजदार असून जानकार हा दुकानदार आहे. नोव्हेंबर महिन्यात सुतार यांनी तीन बॅटऱ्या चोरी केल्या होत्या. तर २५ डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या पूर्वी आणखी ७ बॅटऱ्यांची चोरी केली. सुतार हे वायरलेस विभागात कार्यरत आहेत. पोलिस उपनिरीक्षक बाबुलाल यल्लाप्पा जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राठोड, कर्मचारी अशपाक सय्यद, मनोज परजणे हे करत आहेत. सध्या हे दोघेही ताब्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.