spot_img
22.8 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

शपथ तासांवर, इच्छुक गॅसवर; आज मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई :मंत्रिमंडळ विस्तारासाठी काही तास बाकी असतानाही शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणालाही शपथ घ्यायला रविवारी या, असा निरोप गेला नाही. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक कायम राहिली. नागपुरात रविवारी दुपारी शपथविधी समारंभ होणार असला तरी मंत्रिपदांबाबतची अनिश्चितता रात्री उशिरापर्यंत कायम होती.
फडणवीस हे शनिवारी दुपारनंतर एकेकाला फोन करून मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी या, असे सांगतील, अशी शक्यता होती. मात्र, रात्रीपर्यंत तसे काहीही झाले नाही. तिन्ही पक्षांच्या इच्छुकांनी खूप वाट पाहिली आणि शेवटी रात्रीच्या विमानांनी ते नागपूरला गेले. शपथविधीच्या २४ ते ३० तास आधी मुख्यमंत्री भावी मंत्र्यांना फोन करतात, असा आजवरचा साधारण अनुभव आहे.
भाजपच्या यादीबद्दल वेगवेगळे तर्क दिले जात आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंजुरीसाठी यादी पाठविली; पण मोदी यांच्या दिवसभराच्या व्यग्रतेमुळे ती रात्रीपर्यंत मंजूर न होऊ शकल्याने पुढचे सगळे अडले, असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने  बोलताना केला.
दुसरा तर्क असाही दिला जात आहे की, मोदी यांनी यादीला आधीच मंजुरी दिली आहे; पण काही धक्कादायक बदल आणि विशेषतः काही ज्येष्ठांना धक्का देण्यात येणार असल्याने दुपारी वा सायंकाळी फोन न करता फडणवीस यांनी रात्री उशिरा वा रविवारी सकाळी भावी मंत्र्यांना फोन करावेत, असे ठरविण्यात आले.
रविवारी दुपारी ३ वाजता शपथविधी समारंभ नागपूरच्या राजभवनात होणार आहे. त्यासाठी १५ तास उरले असतानाही शनिवारी रात्री १० पर्यंत कोणालाही फडणवीस यांनी फोन केलेला नव्हता.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री गिरीश महाजन आणि काही ज्येष्ठ भाजप नेते रात्री उशिरा सागर बंगल्यावर गेले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची बैठक झाली. त्यानंतर दिल्लीतील नेतृत्वाकडून फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर शनिवारी दिवसभर इच्छुक तसेच नेत्यांची मोठी गर्दी झाली होती. फडणवीस यांना रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, संतोष दानवे, नमिता मुंदडा, कुमार आयलानी, बंटी भांगडिया, शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे नेते, आमदार भेटले. शिंदेसेनेचे भरत गोगावले, संजय शिरसाट, दीपक केसरकर यांनीही सागर बंगला गाठला.

ताज्या बातम्या