spot_img
2.9 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

spot_img

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी 5 डिसेंबरला

मुंबई  : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता 8 दिवस झाले, पण अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. विशेष म्हणजे भाजप महायुतीला 237 जागांसह मोठं बहुमत मिळालं आहे. त्यामध्ये, भाजपने 132 जागांवर विजय मिळवला असून शिवसेना शिंदे गटाला 57 जागा जिंकता आल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या असून सध्या तिन्ही पक्षांच्या बैठकांचा धडाका सुरू आहे. दिल्लीत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे हे आपल्या गावी गेले असून भाजप नेते पक्षाच्या पदाधिकारी व आमदाराच्या बैठकी घेत आहेत. त्यामुळे, महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्‍लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्‍चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्रीपपदाच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही वेळापूर्वी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची ऑनलाईन बैठक घेतली. त्यामध्ये, भाजपच्या आमदारांनी सरकार स्थापनेपूर्वी आणि स्थापनेनंतर काय-काय काळजी घ्यायची यासंदर्भात या बैठकीत मार्गदर्शन करम्यात आलं आहे. महायुतीतील सर्वच मित्र पक्षांच्या गटनेत्यांची निवड झाल्यानंतर आता भाजपचा गटनेता कधी निवडला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे, भाजपचा गटनेता म्हणून कुणाची निवड होईल याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या