बीड : बीड विधानसभा निवडणुकीत डॉ.योगेश क्षीरसागरांचा संदीप क्षीरसागर यांच्यापुढे पराभव झाला. मात्र तरी सुध्दा डॉ.योगेश क्षीरसागर हे पुन्हा विधानसभा कार्यक्षेत्रात कामाला लागले असून सध्या काही विधान परिषदेवरील आमदार हे विधानसभेत पोहचल्याने राष्ट्रवादीच्या जागा रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे पाथरी मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांचा विजय झाला. त्यामुळे त्यांची विधान परिषदेची जागा रिकामी झाली आहे. आता त्या जागेवर बीडचे डॉ. योगेश क्षीरसागर यांची वर्णी लागणार असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात मुंबईत चर्चाही झाली असून, फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. ही जागा मराठवाड्यातच राहावी, यासाठीही राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै 2024 रोजी निवडणूक होऊन निकाल लागला होता. यामध्ये मराठवाड्यातून परळीच्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि पाथरीचेअजित पवार गटाचे राजेश विटेकर यांना आमदारकी मिळाली होती. त्यानंतर विटेकर हे लगेच विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरले. त्यांनी काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांचा पराभव केला. त्यामुळे विटेकर यांची जागा रिकामी झाली.
दुसर्या बाजूला बीड मतदारसंघातून अवघ्या 5 हजार मतांनी निसटता पराभव झालेले अजित पवार गटाचे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी मुंबईत जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आदींची उपस्थिती होती. या ठिकाणी पराभूत झाला असला तरी आमदार म्हणून काम करा, अशा सूचना डॉ. योगेश यांना देण्यात आल्या. तसेच पाथरीच्या जागा पुन्हा मराठवाड्यातच ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून विचार केला जात आहे. सर्वांत आघाडीवर डॉ. योगेश क्षीरसागर यांचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे विधानसभेची उमेदवारी हुकलेले डॉ. योगेश यांना विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यावर यावर निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.