परळी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक जण पक्ष बदलत आहे. आशा आहे ती फक्त तिकीट मिळण्याची, पण शरद पवारांनी अनेकांना अस्मान दाखविल्यामुळे नाराजी पसरली आहे. परळीचे नेतृत्व राजेभाऊ फड यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. विधानसभेचे तिकीट फायनल समजून ते आनंदात होते. मात्र आज अचानक राजेसाहेब देशमुख यांचे नाव जाहीर झाल्यामुळे राजेभाऊ फड समर्थक आक्रमक झाले. शरद पवारांच्या फोटोला शाई फासण्यात आली. तसेच बोर्डाची देखील तोडफोड करण्यात आली आहे.
राजेभाऊ फड आणि धनंजय मुंडे यांच्यात मुख्य लढत होईल, असे वाटत होते. पण आज अचानक राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिल्याने फड समर्थकाने शरद पवारांच्या फोटोला फासली शाई दरम्यान राजेसाहेब यांची उमेदवारी जाहीर करताच पक्षातील इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आहे. इच्छुक उमेदवार राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांची कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजाभाऊ फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवार यांचे आणि पक्षाचे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी फाडून टाकले आहेत. तसेच शरद पवारांच्या बॅनरवरील फोटोला फड यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शाई फासली आहे. परळीतून राजेभाऊ फड होते इच्छुक परळी विधानसभा मतदारसंघातून राजेभाऊ फड हे इच्छुक आणि संभाव्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी तशी तयारी देखील केली होती. मागील पंधरा दिवसांपासून ते शरद पवारांच्या भेटी घेत आहेत. त्यांची पवारांसोबत बैठक देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आज शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत मराठा कार्ड खेळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने राजेभाऊ फड हे उद्या अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज करणार असल्याचे समजते.