केज : सोयाबीन काढणीसाठी आणलेल्या परप्रांतीय मजुरांना सोडून गुत्तेदाराने पलायन केले. त्याच्या भीतीने शेतात लपून बसलेल्या मजुरांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात आणून त्यांची त्यांच्या गावी पाठविण्यासाठी बाल कल्याण समितीचे तत्त्वशील कांबळे यांच्या मदतीने व्यवस्था केली.
केज तालुक्यातील चिंचपूर शिव ारातील शेतात दहा ते बारा अनोळखी इसम शेतात असल्याचे एका शेतकर्याला आढळून आले. त्या शेतकर्याने ही माहिती पोलिसांना कळविली. त्या नंतर पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश बनसोडे, पोलिस जमादार बाळासाहेब अहंकारे, पोलिस नाईक शिवाजी कागदे यांनी शेतात जाऊन त्या अनोळखी इसमांना पोलिस ठाण्यात घेऊन आले.
त्यांची चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, त्यांना सोयाबीन काढणीसाठी उत्तर प्रदेशातून घेऊन आलेला मजूर ठेकेदार हा त्यांना सोडून पलायन करून निघून गेला आणि त्यांना धमकी दिली. त्यामुळे ते मजूर भीतीने शेतात लपून बसले होते. त्यानंतर पोलिसांनी बालविकास समितीचे तत्त्वशील कांबळे यांच्याशी संपर्क साधून जिल्हा कामगार अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था करण्यासंदर्भात माहिती घेतली. तसेच केज पोलिसांनी त्या दहा मजुरांची जेवण व नाष्टा याची व्यवस्था केली.