राज्यातील गृह खाते सध्या निद्रावस्थेत-संदीप क्षीरसागर
बीड : बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ बीड जिल्हाधिकारी कार्यालय समोर महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यातील गृह खाते सध्या निद्रावस्थेत असून, गृह खात्याने फोडाफोडीचे राजकारण करण्याऐवजी कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी काम करावे असे मत आ. संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
बदलापूर येथे दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासोबतच राज्यातील विविध ठिकाणी महिलांवर व मुलींवर अत्याचार होत असल्याचे दररोज समजत आहे. यावरून राज्यातील सरकारचे गृह खाते सध्या कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याऐवजी फोडाफोडीचे राजकारण करण्यातच व्यस्त आहे. राज्यातील जनसामान्यांच्या सुरक्षा प्रश्न उपस्थित झाला की गृह खाते निद्रावस्थेत जाते. फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा गृह खात्याने आणि सरकारने कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी काम करायला हवे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केले. दरम्यान आजच्या दिवशी बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी कडून बंद पुकारण्यात आला होता परंतु व न्यायालयाच्या सूचनेनंतर बंद मागे घेऊन राज्यातील सर्व भागांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर महाविकास आघाडीतील घटक पक्ष व इंडिया आघाडीतील मित्रपक्ष यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी बदलापूर घटनेत अत्याचारी असलेल्या नराधमास फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आंदोलकांनी केली. याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषाताई दराडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, परमेश्वर सातपुते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.नामदेव चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी तसेच इंडिया इंडिया आघाडीतील मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.