गेवराईच्या गटशिक्षणाधिकार्यांचा महाप्रताप
बीड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांना अंधारात ठेवून गेवराई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी तीन केंद्रप्रमुखाची ज्येष्ठ शिक्षणाधिकारी पदावर बेकायदेशीर रित्या नियुक्ती केली आहे. गटशिक्षणाधिकार्यांनी परस्पर केलेल्या या प्रतापामुळे ’हम करे सो कायदा’ या वृत्तीप्रमाणे गेवराई तालुक्यातील शिक्षण विभागाचा कारभार सुरू आहे. अर्थपूर्ण व्यवहारातून झालेल्या या तात्पुरत्या नियुक्तीमुळे मात्र शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
गेवराई तालुक्यामध्ये ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकार्यांची ०६ मान्य पदे आहेत. सध्या गेवराई येथे दोन शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरतआहेत. रिक्त पदे असल्याच्या नावाखाली गटशिक्षणाधिकारी महोदयांनी चक्क आयुक्ताचे अधिकार वापरून तीन केंद्रप्रमुखांना ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीपदी नियुक्ती दिली आहे. सदर नियुक्ती देण्यासाठी त्यांनी शिक्षणाधिकारी किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांची मान्यता घेतली नाही. गेवराई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी गेवराई येथील तीन केंद्रप्रमुखांना विस्तार अधिकारी पदावर अधिकार नसताना नियुक्ती दिली आहे. गेवराई तालुक्यातील शेळके गोविंद, मोरे संजय मनोहर, शेमे विठ्ठल एकनाथ या तीन केंद्रप्रमुखांना बेकायदेशीररित्या विस्तार अधिकारी केल्यामुळे गेवराई तालुक्यात संताप करण्यात आला. गेवराई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सोनवणे यांनी चक्क मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड आणि विभागीय आयुक्त यांचे अधिकार वापरून केलेल्या बेकायदेशीर नियुक्त यांची चौकशी करण्यात यावी, आणि संबंधिताविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.