केज : केज तालुक्यातील सारणी (सांगवी) येथील गणेश श्रीराम घोळवे याची नुकत्याच लागलेल्या एमपीएससी परीक्षेच्या निकालामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. या त्याच्या निवडीबद्दल सर्वच स्तरामधून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
गणेश मुळातच होतकरु असल्याने आणि खाकी वर्दीचे आकर्षण त्याला लहानपणापासूनच होते. कारण गणेशची आत्या पोलीस खात्यामध्ये नोकरी करीत असल्यामुळे तसेच त्याचा चुलत भाऊ हा पोलीस विभागामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असल्यामुळे त्याच्या नजरेत खाकी वर्दी विषयी आकर्षण आणि त्या माध्यमातून जनसेवा करण्याची त्याची मनोमन इच्छा होतीच. त्याला दोन वेळेस अपयश येऊनही तिसर्या वेळेस मात्र त्याचे स्वप्न साकार झाले. वडील श्रीराम घोळवे हे गावातीलच शैक्षणिक संस्थेमधून प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदावर निवृत्त झाले तर आई गृहिणी आहे.
गणेशचे प्राथमिक शिक्षण गावातीलच (सारणी सां.) जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे तर माध्यमिक शिक्षण हे छत्रपती संभाजीनगर येथील सेंट लॉरेन्स हायस्कूल येथे पुर्ण झाले, उच्च माध्यमिक हे छत्रपती संभाजीनगर येथील चाटे कनिष्ठ महाविद्यालय येथे पुर्ण झाले तर उच्च शिक्षण पुणे येथीला व्हीआयटी येथे २०१९ मध्ये पुर्ण झाले. शिक्षण पुर्ण झाले परंतु मनात खाकीतला अधिकारी होण्याचे स्वप्न शांत बसू देत नव्हते. त्यामुळे २०२० पासून एमपीएससीचा अभ्यास सुरु केला, दोन परिक्षेत अपयश आले. परंतू गणेशने अभ्यासातील चिकाटी आणि जिद्द सोडली नव्हती. एमपीएससी कडून २०२२ ला एकूण ६०३ जागेसाठी जाहिरात प्रकाशित झाली. आक्टोबर २०२२ मध्ये प्रिलियम उतिर्ण होऊन मेन्स परिक्षेसाठी पात्र झाला. या जाहिरातीची मेन्स परिक्षा सप्टें.२०२३ मध्ये झाली तर मुलाखत १२ जुलै २०२४ झाली या परिक्षेत आपला निकाल येणार याची खात्री मनात असल्यामुळे निकालाची ओढ गणेशला होती आणि दि.०१ आगष्ट २०२४ रोजी एमपीएससीचा अंतिम निकाल प्रकाशित होऊन एनटी-ड प्रवर्गातून गणेश पोलिस उपनिरिक्षक झाला. कुठलाही क्लासेस ज्वाईन न करता हे यश गणेशने आपल्या अभ्यासातील सातत्य, चिकाटी आणि जिद्दीवर मिळवले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र यांच्याकडून गणेशवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.