spot_img
3.5 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img

गेवराईत निवडणुकीला हिंसक वळण

सत्ताधारी राष्ट्रवादी भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
बीड राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडवणुकीचे मतदान शांततेत सुरू असताना बीडमध्ये मात्र या निवडणुकीला गालबोट लागले. बीडच्या गेवराईत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपच्या समर्थक एकमेकांपुढे उभे टाकले. त्यातून झालेल्या वादातून त्यांनी एकमेकांवर दगडफेक केली. यामुळे येथे मोठा तणाव निर्माण झाला आहे. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे.
गेवराई नगरपालिकेसाठी आज मतदान सुरू आहे. सर्वच पक्षांनी ही नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी ताकद लावली आहे. त्यातून वरील घटना घडली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, गेवराई नगरपालिकेसाठी मतदान सुरू असताना दुपारी अचानक सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंडित गट व भाजपच्या लक्ष्मणराव पवार गटात तणाव निर्माण झाला. त्यानंतर या दोन्ही गटांनी हातघाईवर येत एकमेकांवर दगडफेक केली. त्यात लक्ष्मणराव पवार यांच्या घरापुढे दगडफेक करण्यात आली. तसेच गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. यावेळी खबरदारी म्हणून पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
या घटनेची माहिती मिळताच बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गेवराईच्या मोंढा नाका परिसरात पवार पंडित यांच्या पुतण्यांमध्ये बाचाबाची झाली. माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे पुतणे शिवराजे पवार व विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज पंडित यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांसोबत भिडले.
तणावासाठी विरोधक जबाबदार अमरसिंह पंडित
दुसरीकडे, अमरसिंह पंडित यांनी या घटनेसाठी विरोधकांना जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, मला मागील दोन-तीन दिवसांपासून याची कुणकुण लागली होती. शांततेत सुरू असणार्‍या निवडणुकीत अशा प्रकारच्या घटना घडवून विरोधक लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचे काम करणार हे मला ठावूक होते. कारण, त्यांनी या निवडणुकीत विकासाच्या मुद्यावर एकही शब्द बोलला नाही. त्यांचे म्हणणे एकच होते की, निवडणुकीच्या निकालात कळेल की आम्ही काय केले? आम्ही १८ वर्षांचा हिशेब मागत होतो. पण ते काहीच बोलत नव्हते. विजयसिंह यांनी आमदार झाल्यानंतर एका वर्षात भरपूर विकासकामे केली.
विकासाच्या मुद्यावरून लोकांची दिशाभूल करून त्यांचे लक्ष दुसरीकडे घेऊन जाण्याचा हा प्रयत्न होता. मतदान अतिशय शांततेत सुरू आहे. मतदान जवळपास ५० टक्क्यांवर गेले आहे. सकाळच्या घटनेनंतर शहरात कुठेही काही घडले नाही. मतदार बाहेर येत आहेत. लोकांनी कुणाच्याही दहशतीला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे ते म्हणालेत.
बीडच्या परळीत बोगस मतदानाचा प्रयत्न
दुसरीकडे, बीडच्या परळीत बोगस मतदानाचा प्रयत्न झाला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने हा प्रकार उधळवून लावला आहे. शरद पवार गटाचे राजाभाऊ फड व दीपक देशमुख यांनी आक्रमक होत बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला मतदान केंद्राबाहेर पळवून लावले. परळी शहरातील प्रभाग क्र. १२ मधील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.

ताज्या बातम्या