मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. यावेळी आझाद मैदानातून मनोज जरांगे पाटील सर्व मराठा आंदोलकांना मार्गदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बोलताना यापूर्वीच १० टक्के आरक्षण दिलं आहे, आंदोलन करणार्यांनी अभ्यास करुन मागणी करावी, असं म्हटलं होतं. मनोज जरांगे यांना एकच दिवस आंदोलन करता येणार असल्याने सरकारलाही यातून योग्य मार्ग काढावा लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की आज कोट्यावधी लोक मुंबईत आणली आहेत. आम्हाला माज मस्ती नाहीय आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा आणि गोरगरीब मराठ्यांचा सामना करा. हे मराठे मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाहीत. आमच्या आंदोलनाची परवानगी आत्ताच्या आत्ता वाढवून द्या. त्यासाठी आम्हाला सहकार्य करा. तुम्ही जर अडथळे आणले तर पुन्हा मराठा समाज मुंबईकडे निघेल. मी जागा सोडणार नाही. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून घरोघरातून मराठ्यांनी मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायचे ठरवलं होतं. आता आपल्याला सरकारने सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुक केले. त्यामुळे आता तुम्हालाही सहकार्य करायचे आहे. पुढील दोन तासांत मुंबई मोकळी करा. कोणीही जाळपोळ, दगडफेक करायची नाही. मराठ्यांची मान खाली जाईल असं एकही पाऊल कुणी उचलायचं नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही. आपण समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलो आहोत. आपण शिकलो नाही, आपण लोकांच्या बुद्धीने चाललो त्यामुळे सत्तर वर्षे वाटोळे झालं हे मराठ्यांनी विसरू नका, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.