जुन्नर : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी काल (२७ ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. आज सकाळी मनोज जरांगे पाटील आता शिवनेरीवर पोहचले. यानंतर मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जुन्नरजवळ मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव असून मुंबईतील मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील वरपगाव येथील सतीश ज्ञानोबा देशमुख हे त्यांच्या मित्रा सोबत मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत मुंबई येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाले होते. ते पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे आले असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याने केज तालुक्यात एक मराठा योद्धा आरक्षणाच्या लढाईत कामी आला आहे. मागील तीन वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाचा देखील विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला होता. त्यांच्या पश्चात पत्नी नंदुबाई, मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार आहे.
सतीश देशमुखांच्या मृत्यूनंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.