धनंजय मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आज बीड शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांची विधानभवन मुंबई येथे भेट घेऊन या प्रकरणात बीड जिल्हा बाहेर सेवेत असलेल्या एका अनुभवी आय पी एस दर्जाच्या महिला पोलिस अधिकार्याच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (डखढ) स्थापन करून स्वतंत्र चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
बीड शहरातील उमाकिरण संकुलात आरोपी विजय पवार व प्रशांत खटोकर यांनी अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी वैद्यकीय रजेवर व अन्य तालुक्यात नियुक्त असलेल्या अधिकार्यामार्फत नाट्यमय रित्या अटक केली असून, या प्रकरणात सुरू असलेला तपास समाधानकारक नाही, तसेच याप्रमाणे अनेक मुलींचे लैंगिक शोषण या नराधमांनी केले असून त्यांना असलेल्या स्थानिक राजकीय पाठबळमुळे इतर पीडित मुली तक्रार द्यायला धजावत नाहीत, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या दबावातून या आरोपींना वाचवण्याचे काम केले जाऊ शकते, त्यामुळे या प्रकरणात पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी एका महिला आय पी एस अधिकारी यांच्यामार्फत स्वतंत्र निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
या प्रकरणी तपासात डिजिटल पुरावे गोळा करणे ही प्राथमिकता होती, मात्र आरोपी, त्यांचे नातेवाईक, मदत करणारे यांचे सीडीआर, आयपीडीआर, व्हॉटसअप चॅट, इन्स्टा, चॅट, प्रायव्हेट कॉलिंग, मोबाईल डेटा मधील व्हिडिओ, फोटो, व्हॉटसअप कॉल, फेस टाईम कॉल यांपैकी पोलिसांनी अद्याप काहीही ताब्यात घेतले नसल्याची माहिती आहे, तसेच संकुलात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये 13 जून पूर्वीचे फुटेज उपलब्ध नाही, अशा अनेक त्रुटी पोलीस तपासात दिसून येत असल्याचा उल्लेखही धनंजय मुंडे यांनी केला आहे.
या प्रकरणातील पीडिता व तिच्या कुटुंबीयांना स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निकटवर्तीयकडून धमकावले जात असून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणला जात आहे, अशाच प्रकारच्या दबावामुळे इतर पीडित मुली समोर येऊन तक्रार द्यायला धजावत नाहीत, असेही मुंडेंनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान संबंधित आरोपींपैकी विजय पवार यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असून, ते स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सोबत अनेक व्यवहार एकत्र करतात, बेनामी जमिनी, प्लॉट, रेड झोन मध्ये खाजगी शाळेचे बांधकाम असे अनेक काळे कारनामे यांनी संगनमताने केले असून याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
दरम्यान पवार व त्याच्या गँग ने कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून हजारो रुपयांची फी वसुली केलेली आहे. तसेच वेळेत फी भरू न शकलेल्या गरीब कुटुंबातील मुलींना टार्गेट केले आहे. क्लासेस च्या नावाखाली केली जाणारी ही आर्थिक लूट थांबावी, यासाठी बीडच नव्हे तर सबंध राज्यातील कोचिंग क्लासेस चालकांना फी मर्यादा, वसुली, विद्यार्थ्यांची सुरक्षा यांसारख्या कायदेशीर व नैतिक संहिता लागू करण्यासाठी एक धोरण निश्चित केले जाऊन तशी नियमावली निर्गमित केली जावी, अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली असून, अशी मागणी करणारे धनंजय मुंडे हे पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले आहेत! दरम्यान धनंजय मुंडे यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिले आहे.