गेवराई : शनिवारी रात्री अकराच्या सुमारास जालना जिल्ह्यातील शहागड येथील पैठण फाटा हायवेवर वाहनावर झालेल्या गोळीबार प्रकरणी ड्रायव्हर गंभीर जखमी झाला होता .जी गाडी तो ड्रायव्हर चालवत होता त्या गाडीत पोलिसांना पिस्तूल आढळून आल्याने गाडीत बसलेले गाडी मालक बी .एम मस्के यांना गोंदी पोलिसांनी संशयावरून अटक केली असून दिनांक १६ रोज सोमवारी बी एम मस्के यांना अंबड न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने मस्के यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली . याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की शनिवार दिनांक १४ डिसेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास गेवराई तालुक्यातील रेवकी येथील सरपंच पुत्र, संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मस्के हे आपला ड्रायव्हर कुबेर प्रकाश सोनवणे यास सोबत घेऊन छत्रपती संभाजी नगरकडे जात असताना शहागडपुढील पैठण फाट्यासमोर हायवेवर अचानक गोळीबार झाला . आणि त्यामध्ये ड्रायव्हर कुबेर याच्या पोटाला गोळी लागली . त्यामुळे त्याचा गाडीचा ताबा सुटून गाडीने चार-पाच पलट्या मारल्या . दरम्यान गाडीचे बलून ओपन झाल्याने बी .एम मस्के हे बालंबाल बचावले . पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्यांना बी एम मस्के यांच्या ग्लोबस्टार वाहनात गोळीबार केलेले पिस्तूल आढळून आले . त्यानंतर पोलिसांनी जखमीला शासकीय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केले होते . आणि बीएम मस्के यांना ताब्यात घेऊन गोंदी पोलीस स्टेशनला नेले होते . शनिवार ,रविवार आणि सोमवार पोलीस कोठडीत राहिल्यानंतर गोंदी पोलिसांनी सोमवार दिनांक १६ रोजी अंबड न्यायालयात बी एम मस्के यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली . त्यामुळे मस्के सध्या पोलीस ठाण्यामध्ये कोठडीत आहेत . जरवरी ड्रायव्हर कुबेर प्रकाश सोनवणे राहणार ( बागपिंपळगाव वसाहत ) याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथेच सोमवारी दुपारनंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती . याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही . या गोळीबार प्रकरणी बीड आणि जालना जिल्हयात खळबळ माजली आहे . बी एम मस्के यांच्या वाहनावर कुणी गोळी झाडली ? याचा शोध पोलिस घेत आहेत . मात्र ड्रायव्हर कुबेर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे .