spot_img
25 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

१६-१७ स्कॉर्पियो आल्या, ४०-५० गुंड उतरले

बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
बीड जिल्ह्यात पवनचक्कीच्या वादातून घडलेल्या खूनाच्या घटनेचा धक्का अजून ताजा असतानाच धाराशिव जिल्ह्यातही पवनचक्की ठेकेदारांचा दहशत माजवण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा या गावात रिन्यू कंपनीच्या पवनचक्की उभारणीच्या कामाला गावकर्‍यांनी परवानगी नाकारली होती. मात्र, गावकर्‍यांचा विरोध मोडून काढण्यासाठी १६-१७ काळ्या स्कॉर्पियो गाड्यांमधून ४०-५० बाऊन्सर्स गावात दाखल झाले आणि धमकावण्याचा थरार सुरू केला.
गावात बाऊन्सर्सनी गावकर्‍यांना अरेरावीच्या सुरात धमकावत दहशतीचं वातावरण तयार केलं. शुक्रवारी तब्बल दोन तास गावभर ही गुंडागिरी सुरू होती, मात्र वारंवार संपर्क साधूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत. अखेर तुळजापूरचे भाजपाचे स्थानिक पदाधिकारी विशाल रोचकारी यांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केलं.
पवनचक्की कंपनीचे गुंड ठेकेदार पोलिसांच्या मदतीनेच गावात दहशत निर्माण करून बळजबरीने पवनचक्क्या उभारत असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. तशी तक्रार त्यांनी धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांना दिली आहे . मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. पवनचक्की ठेकेदाराच्या या दहशतीने गावकरी मात्र पूर्ण धास्तावलेले पाहायला मिळाले. या घटनेमुळे गावात प्रचंड भीतीचं वातावरण आहे. ठेकेदार आणि बाऊन्सर्सच्या दहशतीने गावकरी घाबरले आहेत. प्रशासनाने या गुंडगिरीवर तत्काळ कारवाई करावी आणि दोषींवर कडक पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. बीडनंतर धाराशिव जिल्ह्यातही अशा घटनांची पुनरावृत्ती होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर धाराशिवचे पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची जिल्हाभरातील पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक घेतली.धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पवनचक्की प्रोजेक्ट सुरू असून पोलीस अधीक्षकांच्या बैठकीला ६० ते ७० प्रतिनिधींची हजेरी होती. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणावर सुरु असून संतोष देशमुख हत्याकांडानंतर प्रशासनही धास्तावलं आहे. बीडच्या शेजारीच असणार्‍या धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींना पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी घडणार्‍या गोष्टींवर नजर राहावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तसेच पवनचक्की प्रकल्पावरील खासगी सुरक्षा रक्षकांकडून कोणाला दमदाटी होणार नाही याची काळजी घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत.

ताज्या बातम्या