विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. राज्यात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले. महायुतीने राज्यात २३० जागा जिंकल्या. दरम्यान, आता मुख्यमंत्रिपद कोणत्या पक्षाला मिळणार या चर्चा सुरू आहेत. महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष हा भाजपा आहे, भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री हा भाजपाचा होईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. पण दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनीही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळायला पाहिजे अशी मागणी केली आहे.
तर दुसरीकडे नागपूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळी नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्यावरील सीएम एकनाथ शिंदे यांची नेमप्लेट काढण्यात आली होती. यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. तर दुसरीकडे आता काही तासानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचे नेमप्लेट लावण्यात आले आहे. यामुळे आता पुढच्या काही दिवसात कोण मुख्यमंत्री होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजप १३२ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपनंतर सर्वाधिक जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जिंकल्या आहेत. ५७ जागा जिंकत दुसर्या स्थानी असलेल्या शिवसेनेतून आता एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची मागणी होऊ लागली आहे. शिवसेनेचे काही आमदार, नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीलाही गेले होते. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याचे निरोप गेले असल्याचे समजते. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज दिला आहे. एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे की, महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत.