केज : साठवण तलावाच्या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून एका महिलेचे आमरण उपोषण सुरू आहे. तरीही शासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त गावकर्यांनी रस्तारोको आंदोलन केले . प्रशासनाचा जमावबंदीचा आदेश डावलल्याप्रकरणी 400 ते 500 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोरडेवाडी (ता. केज) येथील साठवण तलावास मंजुरी देवून तलावाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री राठोड यांनी 8 ऑगस्टपासून कोरडेवाडी गावात आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना गावकर्यांनी पाठिंबा दिला आहे. या उपोषणाला सात दिवस उलटूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आक्रमक झालेल्या संतप्त गावकर्यांनी 14 ऑगस्टला केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखली. त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान 12 ते 26 ऑगस्ट दरम्यान प्रतिबंधात्मक आदेश सुरू असताना आदेश डावलून रस्ता रोको आंदोलन केल्याने गोपनीय शाखेचे पोलीस नाईक मतीन शेख यांच्या तक्रारीवरून स्वप्नील महादेव वरपे (रा. कोरडेवाडी ता. केज) यांच्यासह बाळराजे आवारे पाटील, बाळराजे आवारे पाटील, सरपंच दता कोरडे, गंगाधार यादव यांच्यासह कोरडेवाडी गावातील अंदाजे 400 ते 500 महिला-पुरुष आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.