मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत महाराष्ट्रातील तब्बल एक कोटी ३२ लाख महिलांचे अर्ज मंजूर झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारने मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू केली आहे. राज्याच्या या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
याचा विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यत्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळणार आहे. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणार्या कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत.
या योजनेचे अर्ज भरताना महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सरकारने या योजनेचे अर्ज भरण्यासाठी नुकतेच एक पोर्टल लॉन्च केले आहे. त्यामुळे अर्ज भरण्यास गती मिळाली आहे. या योजनेसाठी एक जुलैपासून अर्ज भरले जात असून ज्या महिला ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज भरतील त्यांना एक जुलैपासून पैसे मिळणार आहेत.
म्हणजेच पात्र ठरणार्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत. हे पैसे १७ ऑगस्ट २०२४ ला अर्थातच रक्षाबंधनाच्या आधीच महिलांच्या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन राज्य सरकारने आखले आहे.
खरंतर, या योजनेसाठी आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी अर्ज भरले आहेत. मात्र अर्ज केला म्हणजे या योजनेचे पैसे मिळतीलचं असे नाही. तर जे अर्ज सरकारकडून स्वीकृत होतील त्याच महिलांना याचे पैसे मिळणार आहेत. विशेष म्हणजे या योजनेचा पहिल्या टप्प्यातील लाभ मिळाल्यानंतर ज्या महिला अर्ज करतील म्हणजे १७ ऑगस्ट नंतर जे अर्ज येतील आणि मंजूर होतील त्या महिलांना सुद्धा जुलै महिन्यापासूनच लाभ मिळणार आहे. अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे वितरित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, जर तुम्हीही या योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा तुमच्या परिवारातून कोणी या योजनेसाठी अर्ज सादर केला असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. कारण की, आज आपण या योजनेचे पैसे नेमक्या कोणत्या बँक खात्यात जमा होणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत. खरे तर या योजनेअंतर्गत थेट डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. अर्थातच, तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात या योजनेचे पैसे जमा होणार आहेत.
कोणत्या बँक खात्यात जमा होणार रक्कम ?
लाडकी बहिण योजनेचे पैसे कोणत्या बँक खात्यात जमा होणार हे चेक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्डच्या अधिकृत साइटवर जायचे आहे. https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायची आहे.
येथे तुम्हाला तुमचा १२ अंकी आधार क्रमांक, कॅप्चा कोड, ओटीपी टाकून लॉगइन करायचे आहे. मग Bank Seeding Status (बँक सीडिंग स्थिती) असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करायचे आहे. यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि बँकेचे नाव दिसेल. आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल. आधारकार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे येणार आहेत.