कृष्णकुमार निकोडे
मो.९४२३७१४८८३.
जगात असे बरेच दिवस असतात जे साजरे केले जातात, परंतु काही दिवस अनोखे देखील दिसतात. असाच एक दिवस म्हणजे जागतिक सर्प दिन- वर्ल्ड स्नेक डे सापांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. साप हा अशा प्राण्यांपैकी एक आहे ज्याबद्दल जगात बहुधा जास्त गैरसमज आहेत. लोकांना सापांच्या प्रजातींची माहिती देण्याची संधी म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. सापांच्या विविध सुमारे ३६ प्रजाती आहेत. यामध्ये नाग, घोणस, मण्यार, फुरसे, धामण, दिवड, नानेती, कवड्या, तस्कर, गवत्या यांचा समावेश आहे. भारतात काही ठिकाणी सापांना देव मानलं जातं आणि त्यांची पूजाही केली जाते. एक खास सण नागपंचमी सर्पांना समर्पित आहे. मात्र भारतासह जगात सापांबाबत अनेक गैरसमज आहेत. हे अतिशय महत्त्वाचे प्राणी आहेत आणि पर्यावरणासाठी त्यांना खूप महत्त्व आहे. पण लोकांना सापाची जास्त भीती वाटते. सापाबद्दल अनेक दंतकथाही बनवल्या गेल्या आहेत. साप हा जगातील सर्वात प्राचीन प्राण्यांपैकी एक मानला जातो. जगातील जवळजवळ प्रत्येक प्रांतामध्ये, शहरांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. आज जगात सापांच्या सुमारे ३४५८ प्रजाती आहेत. उत्तर कॅनडाच्या बर्फाळ टुंड्रापासून ऍमेझॉनच्या हिरव्या जंगलांपर्यंत प्रत्येक वाळवंटात आणि महासागरात साप आढळतात. फार कमी लोकांना माहित आहे की, शेतात साप शोधणे चांगले लक्षण मानले जाते. साप शेतातील किटक खातात जे पिकांचे नुकसान करतात. याशिवाय, पिकांची नासाडी करणारे उंदीरही साप खातात. आपल्या पिकांचं, धान्याचं रक्षण व्हावं यासाठी जगातील अनेक शेतकरी साप पाळतात.
कुतूहल निर्माण करणारा हा प्राणी आहे. साप दिसायला अतिशय आकर्षक असतात तितकंच काही सापांचं सौंदर्य भयावह असतं. सापांचे पूर्वज हे डायनासोर, सरपटणारे प्राणी यांचेही पूर्वज आहेत हे फार कमी लोकांना माहीत आहे. जगात कमी पण तरीही लोक सापांना पाळीव प्राणी म्हणून पाळतात. सहसा भारतासारख्या देशात सापांची खूप भीती असते. साप चावतील या भीतीने त्यांची हत्याही केली जाते. पण, आता परिस्थिती बदलत चालली आहे. सापांचं संरक्षण करणारे, त्यांची देखभाल करणारे अनेक सर्पमित्रही आपल्याला पाहायला मिळतात. आज १६ जुलै जागतिक सर्प दिन आहे. हा दिवस जागतिकस्तरावर सन १९७०पासून पाळण्यात येत आहे. सापांबद्दल जनमानसात भीतीची भावना आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष आणि साप डूख धरतो हा गैरसमज आहे. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात. खरेतर सर्वच साप विषारी नसतात, केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांचे मुख्य अन्न हे उंदीर आहे. उंदीर हे सर्वाधिक अन्नधान्याचे नुकसान करीत असतात. उंदीर शेतातील उभ्या पिकांबरोबरच साठवणुक केलेल्या अन्नधान्याचे नुकसान करत असतात. उंदरांचा जन्मदर सर्वाधिक असल्याने एक उंदराची जोडी वर्षाला ८८८ पिलाना जन्म देते आणि एक धामण एका आठवड्याला फक्त ५ उंदीर खाते. तर वर्षाला २६० उंदीर खाते. धामणीचं वय २० वर्षांचं असतं. एक धामण मारली तर कोट्यावधी उंदरांचा जन्म होत असतो. शासकीय आकडेवारीनुसार दरवर्षी उंदीर आणि घुशी अन्नधान्याच्या उत्पादनातील ३० टक्के नुकसान करते. उंदरांची संख्या सिमीत ठेवण्यासाठी निसर्गाने सापांची निर्मिती केली आहे. मग आपण सापच मारले तर उंदरांची संख्या झपाट्याने वाढेल. अन्नधान्याची नासाडी होऊन शेतकर्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असते. तसेच उंदरांमुळे अनेक जिवघेण्या रोगांना आमंत्रण मिळत असते. नुकसान टाळण्यासाठी सापांचे संवर्धन व संरक्षण होणे गरजेचे आहे. साप वाचविण्यासाठी प्रथम सापांबद्दलचे समज गैरसमज व अंधश्रद्धा दूर होऊन समाज सज्ञान होणे गरजेचे आहे. साप स्वतःहुन कोणाला चावल्याची घटना अद्याप तरी झालेली नाही. साप दिसला कि त्याला मारा ही समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ग्रामिण भागात साप घरापर्यंत पोहचू नये, म्हणून सापांच्या लपण्याच्या व अडचणीच्या जागा कमी केल्या पाहिजेत. यामध्ये घराचा परिसर स्वच्छ असावा, अडगळीचे सामान ठेऊ नयेत, सरपण आणि गवताची साठवणूक एका उंचीवर करावी. घरांच्या खिडक्यांच्या जवळ झाडे, वेली लावू नये. परिसरात डबके साचणार नाहीत इ.ची खबरदारी घ्यावी. अशा विविध छोट्या छोट्या उपाय योजना केल्या तर साप आपल्या घरात येणार नाही. घराच्या आसपास आणि शेतात साप दिसल्यास त्याला डिवचू नका. त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. तो स्वतःहुन कोणावर हल्ला करणार नाही. आपल्याकडे फक्त ४ प्रजातींचे विषारी साप आढळतात. ते म्हणजे नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे होत. इतर सर्व साप हे बिन विषारी आहेत, हे लक्षात घ्या. सर्प दंश टाळण्यासाठीच उपाय: र सापांचा घरात प्रवेश टाळण्यासाठी घरातील उंदरांची व पालींची संख्या वाढू देऊ नये. र सरपण, अडगळ, कचरा, दगड विटांचा ढीग घराच्या आजूबाजूला ठेऊ नये, र आजूबाजूला तण व गवत राहू देऊ नका, र घराच्या आसपास पाणी साठू देऊ नये कारण त्या पाण्यात बेडकांचा वावर असल्यामुळे साप अन्नाच्या शोधात येऊ शकतो. र रात्रीचे वेळी पायात शूज व सोबत टॉर्च बाळगा, र पावसाळ्यात जमिनीवर झोपू नये, र घरातील व भिंतीतील तडे बुजवा, र सांडपाण्याच्या पाईपला जाळी बसवा, र शेतात काम करताना गवतात एकदम हात घालू नये. सर्पदंशानंतरचा प्रथोमोपचार- सर्पदंश झालेली जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. साप चावलेल्या व्यक्तीस मानसिक आधार द्यावा. नाग व मण्यार साप हाताला किंवा पायाला चावल्यास मनगटाला किंवा मांडीला आवळपट्टी बांधावी. बांधलेली आवळपट्टी दर दहा मिनिटाला सैल करत राहावी. घोणस व फुरसे साप चावल्यास आवळपट्टी किंवा बँडेज बांधू नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी त्वरित दाखल करावे. सर्पदंश झाल्यास काय करू नये- तोंडाने विष ओढण्याचा प्रकार करू नये. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस जास्त हालचाल करू देऊ नये. साप मारून रुग्णालयात घेऊन जाऊ नये. सुरक्षितपणे शक्य असल्यास फोटो काढून सर्पमित्र अथवा डॉक्टरांना दाखवा. सर्पदंश झालेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काप, चिरा जखमेवर घेऊ नये. तसेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीस कोणत्याही मांत्रिकाकडे अथवा मंदिरात घेऊन जाऊ नये. मिरच्या अथवा कडू लिंबाचा पाला रुग्णास खाऊ घालू नये. सापाला मारणे, साप बाळगणे, व्यापार करणे किंवा सापांचे प्रदर्शन करणे हा वन्यजीव कायद्याने गुन्हा आहे. सापांबरोबर स्टंट करण्याचा प्रयत्न करू नये.आजूबाजूला साप निघाल्यास जवळच्या सर्परक्षकाशी संपर्क साधावा. मान्सूनने बर्यापैकी जोर धरला आहे. त्यामुळे या काळात शेती-शिवारात, खळ्यात चारा भरण्याच्या व गुरांच्या गोठ्यात, घराच्या आजूबाजूला अडगळींच्या ठिकाणी साप आढळून येण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात सर्प प्रजातींचा प्रजनन कालावधी देखील असतो. पावसाचे पाणी बिळात, जमिनीतील तडे, पोकळ भागात साचल्याने सर्प बाहेर पडतात व इतरत्र ठिकाणी नवीन आसरा शोधतात. अशावेळी नागरिकांनी, शेतमजूर बांधवांनी घाबरून न जाता सर्पमित्रांना मदतीसाठी बोलवावे. साप आढळून आल्यास त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, काठी अथवा दगड मारू नका, लहान मुले, वृद्धव्यक्ती, पाळीव प्राण्यांना त्यापासून दूर ठेवा, जोखीम पत्करून साप पकडण्याचा प्रयत्न करू नका, सुरक्षित दूर अंतरावर उभे राहून सापावर लक्ष ठेवून तात्काळ जवळच्या सर्पमित्राला संपर्क करून सापाला पकडून निसर्गात सोडून मुक्तपणे जगण्यास सहकार्य करावे, हीच आपणास नम्र प्रार्थना!