नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना तीन आठवड्यांची वेळ दिलीय. सर्वोच्च न्यायालयात आज उत्तर सादर करण्याचे आदेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होते. मात्र अजित पवार गटातर्फे न्यायालयाकडे वाढीव वेळेची मागणी करण्यात आली. ती मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना वाढीव वेळ दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती. सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख न्यायालयासमोर करण्यात आला. अजित पवार गटाने तीन आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिलाय. गेल्या सुनावणीत अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी त्यांच म्हणणं सादर कराव असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता या दोन्ही प्रकरणाची सुनावणी एकाच वेळी घ्यायची असे सर्वोच्च न्यायालयाने ठरवले होते. दोन्ही प्रकरणे जवळपास सारखीच आहे. सुनावणी एकत्र न घेता एकाच दिवशी लागोपाठ घ्यायची असे ठरवले होते. त्यानंतर आज सुनावणीची वेळ ठरली होती. सरन्यायाधीशांसमोर एकूण आज 14 प्रकरणे होती. त्यात सातव्या क्रमांकावर आमदार अपात्रता प्रकरण होते. पहिल्यांदा शिवसेना आणि त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी आमदार प्रकरणाचे प्रकरण होते.