नवी दिल्ली (वृत्तसंस्था): दोन एकर शेतीसाठी हरियाणातील अंबालमधील नारायणगड येथे माजी सैनिकाने आपल्या आई,भाऊ-वहिनीसह पाच जणांचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी हा फरार झाला असून जखमी वडीलांवर नारायणगड येथे उपचार सुरू आहेत.
हरियाणामधील धक्कादायक घटना समोर आली असून नारायणगड येथे दोन एकर शेतीच्या वादातून एका माजी सैनिकाने आपला भाऊ हरीश (वय ३५), त्याची पत्नी सोनिया (वय ३२), आई सरोपी (वय ६५), पुतणी यशिका (वय ५) आणि पुतण्या मयंक (वय ६ महिने) यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकण्याचा देखील प्रयत्न केला. यामध्ये वडील ओमप्रकाश आणि पुतणी जखमी झाले असून त्यांच्यावर नारायणगड येथे उपचार सुरू आहेत. अंबालाचे पोलिस अधिक्षक यांना ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक तैनात केले आहे.