संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरल्याचं दिसून आलं. त्यामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर एक जवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला. सुरुवातीला हा सिलेंडरचा स्फोट असल्याचं काही जणांना वाटलं. पण त्यानंतर हा स्फोट गंभीर असल्याचं समोर आलं.
ज्या ठिकाणी हा स्फोट झाला ते ठिकाण लाल किल्ल्यापासून फक्त ८०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी हा संपूर्ण परिसर रिकामा केला. या ठिकाणी अग्नीशमन दल पोहोचलं असून लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तसेच या ठिकाणी एनएसजीचे वरिष्ठ अधिकारीही दाखल झाले आहेत. त्याचसोबत फॉरेन्सिक टीमही या ठिकाणी दाखल झाली असून ते पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत.
गेल्या चार दिवसात, म्हणजे ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान दिल्लीमध्ये काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये झालेल्या या स्फोटाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. दिल्लीमध्ये झालेल्या या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्य हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचसोबत आर्थिक राजधानी मुंबईमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.

