तात्काळ अटक करून खाक्या दाखवा
परळी वैद्यनाथ : गंगाधर काळकुटे यांना धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करत काळकुटे यांना माझे नाव घेऊन धमकी देणार्या बीड तालुक्यातील शेळके नामक कोणीतरी व्यक्तीस तात्काळ अटक करून त्याला चांगलाच खाक्या दाखवावा, अशी सूचना केली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्या संपर्क कार्यालयाकडून कळवण्यात आली आहे.
सध्या एकूणच दूषित झालेल्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक कोणत्याही विषयात धनंजय मुंडेंचे नाव ओढत आहेत. आज बीड तालुक्यातील शेळके नामक एका इसमाने काळकुटे यांना फोन करून तू परळीत ये, वगैरे आशयाच्या धमकी दिल्याच्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमात व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला होता.
त्याची दखल घेत धनंजय मुंडे यांनी तातडीने एसपी नवनीत यांना फोन करून सबंधित व्यक्तीस तातडीने ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करावी, तसेच या प्रकरणाचे सत्य माध्यमांच्या समोर आणावे; संबंधित व्यक्तीचा धनंजय मुंडे यांच्या शी संबंध नाही, असेही धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलीस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

