मुंबई: गेल्या चार दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन गुंडाळण्यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, ही नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे आज (२ सप्टेंबर) दुपारी काही पोलीस अधिकारी स्वत: ही नोटीस घेऊन आझाद मैदानात आले. ही नोटीस प्रथम मराठा समाजाच्या वकिलांना दाखवण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी व्यासपीठावर गेले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना झोपेतून जागे करत ही नोटीस त्यांच्या हातात ठेवली. त्यामुळे आता मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक पुढे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले होते की, मी मेलो तरी मराठ्यांना ओबीसीतून आणि सगेसोयर्यांचे आरक्षण मिळाल्याशिवाय आझाद मैदान सोडणार नाही. सरकार कोणत्याही थराला जाऊ दे, मी त्या थराला जायला तयार आहे. मला जेलमध्ये टाकले तरी मी तिकडेही उपोषण करेन. मात्र, आझाद मैदान कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता. मात्र, यानंतर काहीवेळातच पोलीस आझाद मैदान खाली करण्याची नोटीस घेऊन धडकले. त्यामुळे आता पुढे मुंबईत काय घडणार, हे पाहावे लागेल.
मुंबई पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
दिनांक २९/०८/२०२५ रोजी पासून आझाद मैदान, मुंबई येथे सुरू केलेल्या आमरण उपोषण या आंदोलना दरम्यान केलेल्या उल्लंघनांमुळे व बेकायदेशीर कृत्यांमुळे मुंबई शहरात सार्वजनिक व्यान्य, सार्वजनिक सुव्यवस्था व सार्वजनिक सुरक्षिततेस गंभीर बाधा निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी अत्यावश्यक असलेल्या जीवनाश्यक वस्तु आणि सेवांचा नागरीकांना पुरवठा करण्याच्या व्यवस्थापनामध्ये अडथळे निर्माण झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्याअर्थी, आपणास यापूर्वी आंदोलन करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानगीतील अटी व शर्तीचे आपण उलंघन केलेले असल्यामुळे तसेच, मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक २६/०८/२०२५ रोजीच्या त्यांच्या अंतरिम आदेशामध्ये दिलेल्या निर्देशांचे आपण उल्लंघन केलेले असल्याने, दिनांक ०१/०९/२०२५ रोजी आपण सादर केलेल्या विनंती अर्जानुसार (या पोलीस ठाण्याचे आवक क्रमांक ११३५/९/२०२५, दिनांक ०१/०९/२०२५) आपण मागितलेली आंदोलनाबाबतची परवानगी वाद्वारे नाकारण्यात येत आहे. त्यानुसार आपण आझाद मैदान परिसर लवकरात लवकर निकत करावा.
पोलिसांनी आम्हाला नोटीस पाठवली आहे. ताबडतोब आझाद मैदान रिकामं करायला सांगितलंय. मात्र ताबडतोब कधीपर्यंत?, असा सवाल विरेंद्र पवार म्हणाले. आम्ही कोर्टात जाणार आहोत. मनोज जरांगेंनीसुद्धा मुंबई पोलिसांकडून नोटीस देण्यात आली आहे. आम्ही कोर्टात जाणार आहोत. पोलिसांच्या नोटीसीला आम्ही कोर्टाच चॅलेंज करणार, अशी माहिती विरेंद्र पवार यांनी दिली.