नाशिक | ज्ञानेश्वर काकड
श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम लीला संस्कृती शैक्षणिक व सामाजिक क्रीडा मंडळाच्या श्री अष्टविनायक गणेश मंडळाच्या तर्फे गणेशोत्सवाचा शुभारंभ मंगलमय वातावरणात करण्यात आला. सकाळी विधीवत पूजा-अर्चा, मंत्रोच्चार व शंखध्वनीच्या गजरात बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. स्थापनेनंतर बालगोपालांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीपर गीते, पारंपरिक नृत्याविष्कार, श्लोक पठण तसेच सामाजिक संदेश देणार्या नाटकांमुळे वातावरण अधिकच भक्तिमय व रंगतदार झाले. छोट्या मुलांच्या या सहभागामुळे गणेशोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुणा दरगुडे यांनी भूषविले, तर सचिव श्री. रंगनाथ दरगुडे यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुणा दरगुडे म्हणाल्या, गणपती बाप्पा हा बुद्धी, समृद्धी व ऐक्याचा अधिष्ठाता आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक बंधुभाव, संस्कृती व परंपरा जोपासण्याचे माध्यम आहे. बालगोपालांच्या या कार्यक्रमातून समाजातील नव्या पिढीला संस्कार मिळत आहेत, हे आमच्यासाठी अत्यंत समाधानाचे आहे. आगामी दिवसांत गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम – पर्यावरण जनजागृती, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे. आयोजक कु. कुणाल सानप कु. हितेश पाटील कु. कुणाल पवार कु. ऋग्वेद पवार कु. देवरात पवार कु. गोलू थोरमिशे कु. सिद्धेश गीते कु. श्लोक पगार यांनी केले.
यावेळी स्थानिक नागरिक, पालक, शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचे साक्षीदार झाले. सूत्रसंचालन व मार्गदर्शन चैतन्या दरगुडे यांनी केलेल्या संस्थेच्या सुयोग्य नियोजनाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.